
वक्फ कायद्याविरोधात देशभरात विविध ठिकाणी निदर्शने सुरूच आहेत. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये 8 एप्रिल रोजी हिंसाचार उफाळून आला होता. यात पोलिसांच्या वाहनांसह अनेक वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. याप्रकरणी एकूण 22 जणांना अटक करण्यात आली असून 8 आरोपींना पुढील तपासासाठी पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी दाखल विविध याचिकांवर येत्या 16 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यालायात सुनावणी होणार आहे. देशभरात आजही अनेक ठिकाणी आंदोलने झाली. कोलकात्यात हजारोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरल्याने वाहतुककोंडी झाली होती.
वक्फ सुधारणा कायद्याविरोधात आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयात 12 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या 3 न्यायमूर्तींचे खंडपीठ 10 याचिकांवर सुमावणी करणार आहे. सरन्यायाधीश संजय खन्ना, न्यायमूर्ती संजय कुमार आणि के. व्ही. विश्वनाथन यांचा या खंडपीठात समावेश असेल. दुसरीकडे अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने आजही देशभरात विविध ठिकाणी सरकारविरोधात तीव्र निदर्शने केली. उद्या भोपाळ येथे दुपारी 2 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत सेंट्रल लायब्ररी ग्राऊंड येथे निदर्शने होणार आहेत. दरम्यान, वक्फ सुधारणा कायद्याबाबत भाजपच्या वतीने देशभरात विविध ठिकाणी जनजागृती सुरू आहे.