छत्तीसगडमध्ये दोन वेगवेगळ्या चकमकीत 22 नक्षलवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद

छत्तीसगडमध्ये गुरुवारी सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये दोन ठिकाणी चकमक उडाली. बिजापूर आणि कांकेर जिल्ह्यात उडालेल्या या चकमकीमध्ये 22 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. या कारवाई दरम्यान एक जवान शहीद झाला आहे. सुरक्षा दलाने चकमक झालेल्या घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जप्त केला आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सुरक्षा दलाचे पथक नक्षलविरोधी मोहिमेवर निघाले होते. यावेळी बिजापूर-दंतेवाडा सीमेवरील गंगापूर भागात सुरक्षा दलाच्या जवानांवर नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. कांकेर येथेही अशीच घटना घडली. या दोन्ही चकमकीत बिजापूर येथे 18 तर कांकेर येथे 4 असे एकूण 22 नक्षलवादी ठार झाले. तर बिजापूर डीआरजीचा एक जवान शहीद झाला. जवानांनी नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले असून एके 47 सह मोठ्या प्रमाणात दारूगोळाही जप्त केला आहे. या भागात अद्यापही शोधमोहीम सुरू आहे.

17 नक्षलवाद्यांची शरणागती

दरम्यान, गेल्या आठवड्यामध्ये बिजापूर जिल्ह्यातील 17 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली होती. हे सर्व नक्षलवादी गंगापूर भागामध्ये सक्रिय होते, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.