
केंद्रीय शिक्षण विभागाच्या स्टार्स उपक्रमा अंतर्गत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत (SCERT) 2024-25 साठी घेण्यात येणाऱ्या संकलित मूल्यमापन चाचणी (PAT) परीक्षेतील नववीची प्रश्नपत्रिका फुटली आहे. यासंदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाल्याची कबुली शिक्षण विभागाने दिली असून व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या 21 यूटय़ूब चॅनेलवर गुन्हा दाखल करून बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावार यांनी दिली.
शैक्षणिक वर्ष 2023-2024पासून प्रतिवर्षी तीन वेळा वर्ग 3 ते 9 साठी प्रथम भाषा, इंग्रजी तृतीय भाषा आणि गणित या विषयांसाठी शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित शाळा व तुकडय़ांमधील विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपत्रिका सर्व माध्यमांमध्ये बनवून व पाठवून आयोजित करण्यात येते. एप्रिल 2025मध्ये अशी सहावी परीक्षा घेण्यात येत आहे. 8 एप्रिलला 8वी, 9वीच्या प्रथम भाषा विषयाची परीक्षा असताना त्यापूर्वीच काही यूटय़ूब चॅनेलवर ही प्रश्नपत्रिका उत्तर पत्रिकेसह दाखविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले.
गोपनीयतेचा भंग केल्या प्रकरणी स्कॉलरशिप स्टडी, ट्विटर एडियम, नॉलेज – गंगा, अनिकेत, ए.ए. क्लासेस, प्रशांत वारे आर्ट्स, झेन झेड लार्ंनग बाय एमआर, एचटी स्टडी 2.0, लर्न विथ अनु 21, सेमी मराठी क्लास, भाषण मित्रा, आर.डी. क्लब, एस.बी. सुरज क्रिएशन, एम.एच. एज्युकेशन, वाय.सी. एज्युकेशन महाराष्ट्र, रायटिंग, स्कॉलरशिप स्टडी, मी गुरुजी, एम.एच. स्टडी, स्टडी टाईम, स्टडी पार्टनर या चॅनलवर गुन्हा दाखल केला आहे.