पिंपरी- चिंचवड शहरातील वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. 10तोडफोड केल्याचा प्रकार ताजा असतानाच त्याच ठिकाणी एकाने लाकडी दांडक्याने पुन्हा सात वाहनांची तोडफोड केल्याची घटना मंगळवारी (24 रोजी) रात्री समोर आली आहे. तसेच वाल्हेकरवाडी येथेही दोन अल्पवयीन मुलांनी 14 वाहनांची तोडफोड केली. ही घटना बुधवारी (25 रोजी) मध्यरात्री तीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी 16 आणि 17 वर्षीय दोन अल्पवयीन मुलांना चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पिंपळे गुरव येथील तोडफोडप्रकरणी निखिल संजय तोडकर (वय 31, रा. कवडेनगर, मयुरनगरी, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निहाल पवार असे गुन्हा दाखल केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. 15 सप्टेबर रोजी मयुरीनगरी येथे दहशत माजविण्यासाठी दोन तरूणांनी 14 वाहनांची तोडफोड केली होती. एवढेच नाही तर पत्ता सांगितला नाही म्हणून गतीमंद तरूणावर कोयत्याने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणात सांगवी पोलीसांनी दोन्ही आरोपींना जेरबंद करून त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न आणि सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न आणि वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले होते. मात्र, या घटनेला दहा दिवसउलटत नाहीत तोच मंगळवारी (दि. 24) रात्री साडेअकराच्या सुमारास मयुर नगरी फेज एक येथे संशयित आरोपी निहाल पवार याने रस्त्याकडेला उभ्या केलेल्या सात वाहनांची लाकडी दांडक्याने तोडफोड केली. फिर्यादी तोडकर हा प्रकार पाहत असताना पवार याने त्यांना उद्देशून शिवीगाळ करीत मला ओळखले का मी निहाल पवार आहे. मी फुगेवाडीचा भाई आहे, असे म्हणत तोडकर यांच्या दिशेने दांडके फेकून मारून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि परिसरात दहशत माजवली.
वाल्हेकरवाडीतील तोडफोडप्रकरणी विपूल संजय जगताप (रा. गुरूद्वारा, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाल्हेकरवाडी मधील गुरुद्वारा परिसरात दोन अल्पवयीन मुलांनी परिसरात दहशत पसरविण्याच्या उद्देशाने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या वाहनांना लक्ष्य केले. त्यांनी परिसरातील 14 मोटारींची तोडफोड केली. यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपास करत दोघांना ताब्यात घेतले.