Hybrid इंजिन, ADAS आणि 360-डिग्री कॅमेरा फीचर्स; Volvo XC90 लॉन्च, जाणून घ्या किंमत

व्होल्वोने हिंदुस्थानी बाजारात आपली Volvo XC90 Facelift कार लॉन्च केली आहे. ही लक्झरी कार 1.03 कोटी रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लॉन्च करण्यात आली आहे, जी सध्याच्या मॉडेलपेक्षा 2 लाख रुपये जास्त आहे. याच कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ…

नवीन व्होल्वो XC90 SUV च्या बाह्य डिझाइनमध्ये बदल दिसून येत आहेत. यात क्रोम-लोडेड ग्रिल आणि मॅट्रिक्स-डिझाइन एलईडी हेडलॅम्प देण्यात आले आहे. मागील बाजूस, टेल लॅम्प देखील बदलण्यात आले आहेत. पुढील आणि मागील बंपर देखील नवीन आहेत. Volvo XC90 Facelift मध्ये ड्युअल-टोन 21-इंच अलॉय व्हील्स, डोअरवर सिल्व्हर क्लॅडिंग आणि विंडोंवर क्रोम बेझल्स देखील आहेत.

फीचर्स

यात नवीन आणि मोठी 11.2-इंच इन्फोटेनमेंट टचस्क्रीन, 12.3-इंच इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, पॅनोरॅमिक सनरूफ, रिफ्रेश केलेले डॅशबोर्ड डिझाइन, पॉवर-अ‍ॅडजस्टेबल सीट्स, कलर हेड-अप डिस्प्ले, फोर-झोन क्लायमेट कंट्रोल, बॉवर्स अँड विल्किन्स आणि नवीन वायरलेस चार्जिंग पोर्ट सारखे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. सेफ्टीसाठी यात 360-डिग्री कॅमेरा, हिल स्टार्ट कंट्रोल, हिल डिसेंट कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि लेव्हल 2 अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS) सेफ्टी यासह अनेक सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत.

पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाले तर, XC90 मध्ये 48V माइल्ड-हायब्रिड तंत्रज्ञानासह 2.0-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 253 बीएचपी आणि 360 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या एसयूव्हीची टॉप स्पीड 180 किमी प्रतितास आहे आणि ही कार 7.7 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडू शकते.