सध्याची ‘महाराष्ट्रविरोधी राजवट’ महाराष्ट्राचा अभिमान, वैभव लुटण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रवासीयांनो… नवे 2024 वर्ष हे आपलं आहे. या वर्षात तुमचे मत तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी फार मौल्यवान आहे. पुन्हा लोकशाही अस्तित्वात आणणे हेच आपले ध्येय आहे. नव्या वर्षात हुकूमशाहीविरुद्ध मिळून लढूया, अंतिम विजय सत्याचाच आहे, असे आवाहन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’ या सोशल नेटवर्किंग व्यासपीठावरून महाराष्ट्रवासीयांनी साद घातली आहे. 2024 हे वर्ष देशासाठी समर्पित करायला हवे, असे त्यांनी म्हटले आहे. देशाच्या लोकशाही मूल्यांचे आणि संविधानाचे कायदेशीर बाबींचाच वापर करून खच्चीकरण केले जात आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी अस्तित्वात आलेल्या संस्थांचा वापर लोकशाही संपवून हुकूमशाही निर्माण करण्यासाठी जगभरात झाला, मात्र त्या ठिकाणी सामान्य लोकांच्या भल्यासाठी काहीही झालेले नाही. जे काही केले गेले ते केवळ काही मोजक्या लोकांसाठी, तुमच्या-माझ्यासारख्या 1.3 अब्ज लोकांसाठी तर नक्कीच नाही, अशी खंत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
आदित्य ठाकरे हे मिंधे सरकारवरही तुटून पडले आहेत. 2022 च्या मध्यात गद्दारांच्या टोळीने शांतीप्रिय आणि प्रगतशील महाराष्ट्राचे रूपांतर बिल्डर्स आणि कंत्राटदार मिळून चालवत असलेल्याला एका बेकायदेशीर राजवटीत केले, अशी जहाल टीका त्यांनी केली. खोके सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे आपली शहरे उद्ध्वस्त होत आहेत. रस्ते, विकास योजनांमध्ये घोटाळे होत आहेत. उद्याने गिळंकृत केली जात आहेत. रस्त्यावरील फर्निचर, सॅनिटरी पॅड्स यांच्या बाबतीतही घोटाळे होत आहेत आणि हे तर केवळ भ्रष्ट कारभाराचे वरवरचे टोक आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरूनही आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चालल्या असून नैसर्गिक आपत्तींना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून नुकसानभरपाई दिली जात नाही, खोके सरकार फक्त बॅनर्सवर दिसतेय, असा आरोप त्यांनी केला आहे.
सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राचे रोजगार लाडक्या राज्यात पळवले
मागच्या दोन वर्षांत आपल्या राज्यात दोन लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करू शकणारे उद्योग राजवटीच्या लाडक्या राज्यात पळवले गेले, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी मोदी सरकारचा अचूक वेध घेतला आहे. या उद्योगांनी नैसर्गिकरीत्या नक्कीच महाराष्ट्राची निवड केली असती, पण त्यांना जबरदस्तीने दूर नेले गेले. उदरनिर्वाहाची स्वप्नं घेऊन देशभरातील लोक महाराष्ट्रात येतात. पण आपल्या राज्याला आणि येथील लोकांना मात्र या स्वप्नापासून दूर नेले जात आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
प्रदूषण, भ्रष्टाचार, सरकारी रुग्णालयांमध्ये औषधांचा अभाव, महाराष्ट्रातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांची भीषण अवस्था यांसारख्या अनेक समस्यांना आपण तोंड देत आहोत. एम.टी.एच.एल. आणि दिघा रेल्वे स्थानकासारख्या पायाभूत सुविधा अनेक महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असल्याचेही ते म्हणाले.
समस्या लपवण्यासाठी अशांतता निर्माण केली जातेय
विद्यमान राजवटीने महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी व अन्य मुद्दय़ांपासून भरकटवण्यासाठी धार्मिक व जातीय दंगली, नागरी अशांतता आणि टीव्हीवरील वादविवादांमध्ये आपल्याला व्यस्त ठेवले आहे, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला आहे. जी माणसे वर्तमान आणि भविष्याचा विकास करण्यासाठी काहीच करू शकत नाहीत ती भूतकाळातल्या वादात आपल्याला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करतात, असे त्यांनी म्हटले आहे.
खोके सरकारच्या राजवटीत गुन्हेगार मोकाट
वाढलेल्या गुन्हेगारीवरूनही आदित्य ठाकरे यांनी खोके सरकारवर हल्लाबोल केला. खोके सरकारच्या राजवटीत गुन्हेगार मोकाट सुटले आहेत. एका आमदाराचा मुलगा व्यावसायिकाचे अपहरण करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आला, परंतु आजपर्यंत कोणतीही कारवाई केली गेलेली नाही. दुसरा एक आमदार गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत बंदूक रोखताना कॅमेऱ्यात पकडला गेला. त्याने पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याची बातमीही आपण ऐकली, पण त्याच आमदाराला सिद्धिविनायक गणेश मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष बनवण्यात आले आहे. एका हिंदू सणात, बंदुकीचा धाक दाखवून घाबरवणाऱ्या माणसाला अध्यक्ष केले जाते? हे हिंदुत्व आपण स्वीकारणार आहोत का, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. काही कॅबिनेट मंत्र्यांनी महिला खासदारांना शिवीगाळ केली, काही आमदार फोनवर अधिकाऱ्याला धमकावताना रेकॉर्ड झाले आहेत, परंतु ह्या सर्व कृत्यांसाठी त्यांना बक्षीस म्हणून बढती देण्यात आली आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
ज्यांनी लोभापायी स्वतःला विकले, जे आपले भविष्य विकायलाही मागेपुढे बघणार नाहीत. अशा गद्दारांच्या राजवटीत तुमच्या मुलांची, तुमची प्रगती होईल, असे वाटते का? अशा राजवटीत तुम्ही राहायला तयार आहात का? हे वर्ष विचार करायचे नाही, तर कृती करण्याचे वर्ष आहे. ही कृती म्हणजे तुमचे ‘मत’! तुमचे मत हे तुमचे भविष्य… आपले भविष्य आहे!