मुंबईत शहरी वनीकरणाला बळकटी देण्याबरोबर पर्यावरण संतुलनासाठी वांद्रे येथील पश्चिम द्रुतगती महामार्गालगत पर्जन्यवृक्ष असलेल्या 200 बहावा वृक्षांची लागवड केली जाणार आहे. त्यामुळे मुंबईत पावसाचे प्रमाण वाढण्याबरोबरच ऑक्सिजनमध्येही वाढ होणार आहे.
मुंबईचे पर्यावरण संतुलन टिकवून ठेवण्यासाठी मुंबई महापालिका सतत नवनवीन उपक्रम राबवत असते. या उपक्रमाअंतर्गत मुंबई महापालिका वृक्ष प्राधिकरण आणि मेक अर्थ ग्रीन अगेन (मेगा) फाऊंडेशनच्या सहकार्याने खेरवाडी (वांद्रे) येथे पश्चिम द्रुतगती महामार्गालगत सोमवार, 24 जूनला 200 बहावा वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. अभिनेता अक्षय कुमार आणि महापालिका आयुक्त-प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते सकाळी 9 वाजता हे वृक्षारोपण होणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून अक्षय कुमार हे त्यांचे दिवंगत वडील हरीओम भाटिया आणि आई अरुणा भाटिया यांना श्रद्धांजली वाहणार आहेत. उपआयुक्त (परिमंडळ-3) विश्वास मोटे आणि मेगा फाऊंडेशनच्या डॉ. अनुषा श्रीनिवासन अय्यर आदींसह महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
पर्यावरणाचे नुकसान भरून काढणार
ही वृक्षारोपण मोहीम मुंबईला हरित ठेवण्यासाठी राबवण्यात येत आहे. ‘तौक्ते’ चक्रीवादळानंतर अनेक वृक्षांची पडझड झाली. त्यातून झालेले पर्यावरणाचे नुकसान भरून काढण्यासाठी ‘झाडांचा खड्डा स्वीकारा आणि निसर्गाचे पालक बना’ ही मोहीम राबवण्यात आली आहे.
बहावाची संख्या पोहोचणार 650 वर
मुंबईत सद्यस्थितीत साडेचार हजारांहून अधिक बहावाची झाडे आहेत. त्यात आणखी 200 झाडांची भर पडणार आहे. ही झाडे पिवळय़ा रंगाच्या बहारदार फुलांची सजली की या वर्षी चांगला पाऊस होणार, असे संकेत मिळतात. हे वृक्ष केवळ सावली देत नाहीत, तर ते निसर्गातील बदलांची चाहूलही देतात. बहावाला ‘नेचर इंडिकेटर’ s म्हटले जाते. बहावाची उंची सुमारे 40 फुटांपर्यंत जात असल्यामुळे ऑक्सिजन वाढवण्याबरोबरच पाऊसमानही वाढणार आहे.