Tiger Deaths धक्कादायक! व्याघ्र मृत्यूत महाराष्ट्र अव्वल, चार महिन्यांत 20 वाघांचा मृत्यू

एकीकडे पट्टेदार वाघांची संख्या वाढत असतानाच महाराष्ट्रात त्यांच्या मृत्यूचा आकडाही झपाट्याने वाढत असल्याचे गंभीर चित्र निर्माण झाले आहे. देशात मागील चार महिन्यांत 62 वाघांचा मृत्यू झाला. त्यातील 20 वाघ हे केवळ एकट्या महाराष्ट्रातील आहेत. परिणामी व्याघ्र मृत्यूत देशात महाराष्ट्र अव्वल ठरला तर 17 वाघांच्या मृत्यूने मध्य प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे.

देशभरात 2022च्या व्याघ्रगणनेनुसार देशात 3 हजार 167 वाघांची नोंद झालेली आहे. या व्याघ्रगणनेत महाराष्ट्राचाही वाटा मोठा होता. राज्यात 2018 मध्ये 312 वाघांची नोंद झाली होती, तर 2022 मध्ये त्यात मोठी वाढ होत ती संख्या 444 वर पोहचली. पण व्याघ्र संवर्धनात आघाडी घेतलेल्या महाराष्ट्रात मात्र व्याघ्र मृत्यूची संख्याही मोठी आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात जानेवारी 2025 पासून 26 एप्रिलपर्यंतच्या चार महिन्यांत देशात 62 व्याघ्रमृत्यू झालेले आहेत. हे मृत्यू वन्यजीवांच्या झुंजीत, अपघातात, शिकार वा नैसर्गिकरीत्या अशा विविध कारणांनी झाले आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक 20 मृत्यू झाले आहेत. बहेलिया आणि बावरिया यासह विविध टोळ्यांकडून मागील 5 वर्षात देशभरात तब्बल 100 हून जास्त वाघांच्या शिकारीच्या घटना घडल्याची माहिती अलीकडेच समोर आली होती. त्यात दरवर्षी मोठी वाढ दिसून आली आहे. एक संघटित गुन्हेगारी ‘सिंडिकेट’ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असून वाघांचे अवयव भारतातील विविध भागातून पुरवले जात असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.

मागील पाच वर्षांतील मृत्यू

2020 – 116
2021 —127
2022 —121
2023 —178
2024– 124