छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणारी रात्री 9.57 ची लोकल धडधडत कल्याण स्थानकात येऊन पोहोचली आणि जनरल डब्याबाहेर पोलिसांचा गराडा पडला. पोलीस तातडीने डब्यात शिरले आणि निळय़ा रंगाची ती संशयास्पद बॅग ताब्यात घेतली. आत काय आहे हे समजेना. बॉम्ब तर नाही ना, अशी शंकाही प्रवासी विचारू लागले. मात्र ‘ती’ बॅग पोलीस ठाण्यात नेऊन उघडताच आतमध्ये पाचशे रुपयांच्या नोटाच नोटा होत्या. 20 लाख रुपयांचे हे घबाड नेमके कोणाचे आहे? या बॅगेचा मालक कोण, याचा शोध आता कल्याण पोलीस घेत आहेत.
आसनगाव रेल्वे स्थानकातून रात्री उशिरा मुंबईकडे जाणाऱया लोकलमध्ये फारशी गर्दी नव्हती. जनरल डब्यामध्ये बसलेल्या एका प्रवाशाला बेवारस बॅग दिसली. त्याने बॅगेबाबत अन्य प्रवाशांकडे विचारणा केली. पण कुणीच त्यावर हक्क सांगितला नाही. अखेर या प्रवाशाने पोलीस पंट्रोल रूमला पह्न केला. कल्याण स्थानकात लोकल येताच पोलिसांनी ही बॅग ताब्यात घेतली. बॅग उघडल्यानंतर आतमध्ये 20 लाखांच्या नोटांबरोबरच औषधांचा बॉक्सही आढळला. लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.