>> संदिप आडसुळ, शिरोळ
केंद्रीय ग्रहमंत्री अमित शहा व महाराष्ट्राचे राज्यपाल सी राधाकृष्णन यांच्या आज 25 सप्टेंबर रोजीच्या कोल्हापूर दौऱ्यात निदर्शने करून काळे झेंडे दाखविण्यात येणार असल्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यातर्फे घेण्यात आला. दरम्यान यानंतर शिरोळ तालुक्यातील स्वाभिमानीच्या जवळपास 20 कार्यकर्त्यांना जयसिंगपूर ,शिरोळ आणि कुरूंदवाड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सन 2022-23 गळीत हंगामातील तुटलेल्या उसास प्रतिटन 400 रुपयाचा दुसरा हप्ता मिळावा याकरिता पुणे -बंगळुरू महामार्ग रोखून आंदोलन करण्यात आले होते.
या आंदोलनादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने प्रतिटन 100 रूपयाचा तोडगा काढून आंदोलन स्थगित करण्यात आले. जवळपास 10 महिने झाले तरीही सरकारकडून सदर प्रस्तावांना मान्यता न दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खा. राजू शेट्टी यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्या दरम्यान काळे झेंडे दाखवणार असल्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानीचे शिरोळ तालुका अध्यक्ष रामचंद्र शिंदे,युवा अध्यक्ष बंडू पाटील ,पंचायत समिती माजी सभापती इनुस पटेल, माजी सरपंच राहुल सुर्यवंशी,सतीश चौगुले,प्रकाश माळी,पापालाल शेख,जीनेश्वर टारे,संदिप चौगुले,विश्वास बालीघाटे, विवेक चौगुले,अण्णासो उर्फ बंडू गुदले उमडाळे, बंडू चौगुले,रावसाहेब आलासे,आदी कार्यकर्त्यांना पोलीस जयसिंगपूर ,शिरोळ आणि कुरूंदवाड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.