मुंबईत मतमोजणीसाठी 2 हजार 700 कर्मचारी, 10 हजार पोलीस तैनात; 36 केंद्रांवर मतगणना

अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर मुंबईत विविध पक्षांच्या 420 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त झाल्यानंतर शनिवार, 23 नोव्हेंबर रोजी सकाळी मतमोजणी सुरू होत आहे. यासाठी पालिकेसह प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून 10 हजार पोलीस, 2 हजार 700 कर्मचारी मतमोजणी प्रक्रियेत काम करणार आहेत. मुंबईत 36 विधानसभा मतदारसंघांत 36 केंद्रांवर ही मतमोजणी होणार आहे. यामध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत पहिला निकाल येण्याचा अंदाज आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार यावेळी प्रथमच मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्हा या दोन्ही जिह्यांच्या जिल्हा निवडणूक अधिकारीपदाची संयुक्तपणे जबाबदारी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. पालिका आयुक्तांची जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त विपिन शर्मा, अश्विनी जोशी, अमित सैनी, जिल्हाधिकारी (मुंबई शहर) संजय यादव, राजेंद्र क्षीरसागर (मुंबई उपनगरे) यांच्या देखरेखीखाली मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिह्यातील एकूण 36 मतदारसंघांसाठी विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्हा व मुंबई शहर जिह्यात मतदान सुरळीतपणे पार पडल्यानंतर आता मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी प्रशासनाकडून चोख नियोजन करण्यात आले असून प्रत्येक मतमोजणी केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

तृतीयपंथीयांचे 31.15 टक्के मतदान

मुंबईतील दहा मतदारसंघांमध्ये तृतीयपंथी मतदारांची संख्या 244 आहे. त्यापैकी 76 जणांनी म्हणजेच 31.15 टक्के जणांनी मतदान केले.

शहर मतदानात महिलांची आघाडी

मुंबई शहर जिह्यात एकूण 52.65 टक्के मतदान नोंदकले गेले आहे. मुंबई शहर जिह्यातील एकूण 10 मतदारसंघांत मिळून एकूण 25 लाख 43 हजार 610 मतदार आहेत. यापैकी एकूण 13 लाख 39 हजार 299 नागरिकांनी मतदान केले. त्यामध्ये वर्गीकरण लक्षात घेता 13 लाख 65 हजार 904 पुरुषांपैकी 7 लाख 10 हजार 174 पुरुष मतदारांनी मतदान केले.

तर एकूण 11 लाख 77 हजार 462 महिलांपैकी 6 लाख 29 हजार 049 महिलांनी मतदान केले. इतर 244 मतदारांपैकी 76 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. यानुसार शहरात 53 टक्के महिलांनी हक्क बजावला, तर 51 पुरुषांनी 51 टक्के मतदानाचा हक्क बजावला. तर उपनगरात महिला-पुरुषांनी प्रत्येकी 56 टक्के मतदानाचा हक्क बजावला.

मतपेट्या सीसीटीव्ही, कडेकोट बंदोबस्तात

मतदान झाल्यानंतर सर्क ईक्हीएम क व्हीव्हीपॅट संयंत्रे संबंधित मतदारसंघांच्या स्ट्राँग रूममध्ये कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. एकूण 36 स्ट्राँग रूमच्या सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव सुरक्षा दल (सीआरपीएफ), केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) यांच्यासह राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) तसेच पोलीस तैनात आहेत. हे सर्क स्ट्राँग रूम सीसीटीव्ही निगराणीखाली आहेत.

पहिली मोजणी टपाल मतदानाची

मतमोजणीच्या सुरुवातीला टपाली मतदानांची मतमोजणी होईल आणि त्यानंतर ईव्हीएममधील मतदानाची गणना केली जाईल. प्रत्यक्ष मतमोजणी करण्यासाठी प्रत्येक मतदारसंघानुसार निवडणूक निर्णय अधिकारी, पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक, सूक्ष्म निरीक्षक, सहाय्यक कर्मचारी आदी मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱयांना 15 नोव्हेंबर रोजी प्रशिक्षण देण्यात आले असून 22 नोव्हेंबर रोजी पुन्हा प्रशिक्षण देण्यात येणार आहे.