Chhattisgarh Encounter – सुकमामध्ये चकमक, 2 नक्षलवाद्यांचा खात्मा; शोधमोहीम सुरू

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील किस्ताराम येथे सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. दोन्ही बाजुने जोरदार गोळीबार झाला. यात आतापर्यंत 2 नक्षलवाद्यांनी कंठस्नान घालण्यात आले असून दोन्ही नक्षलवाद्यांचे मृतदेह हाती लागले आहे. त्यांच्याजवळील शस्त्रास्त्रही जप्त करण्यात आली असून परिसरात शोधमोहीम सुरू आहे, अशी माहिती सुकमा पोलिसांनी दिली.

किस्ताराम पोलीस स्थानकांर्गत येणाऱ्या छत्तीसगड-ओडिशा सीमारेषेवरील जंगलामध्ये नक्षलवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे डीआरजी आणि कोबरा पथकाने संयुक्तपणे शोधमोहीम सुरू केली. यावेळी जंगलात नक्षलवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये धुमश्चक्री उडाली.

31 नक्षलवाद्यांचा खात्मा

याआधी, 9 फेब्रुवारी रोजी बीजापूर जिल्ह्यातील नॅशनल पार्क भागामध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. यात 31 नक्षलवादी ठार झाले होते. यावेळी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि कागदपत्र जप्त करण्यात आली होती.

32 लाखांचं बक्षीस, 7 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण

दरम्यान, टेकलगुडम नक्षली हल्ल्यात सहभागी दाम्पत्यासह 7 नक्षलवाद्यांनी शुक्रवारी आत्मसमर्पण केले. त्यांच्यावर 32 लाख रुपयांचे बक्षीस होते. 2021 मध्ये टेकलगुडम येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात 22 जवान शहीद झाले होते.