
फ्लोरिडामधील एका विद्यापीठात स्थानिक डेप्युटी शेरीफच्या मुलाने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला असून 5 विद्यार्थी जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. या गोळीबारामागेच नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
फिनिक्स इकनर असे गोळीबार करणाऱ्यांचे नाव असून तो विद्यापीठातील माजी विद्यार्थी आहे. त्याने फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांवर अंदाधुंद गोळीबार केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि इकनर याला जेरबंद केले. त्यानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर
कॅम्पस बंद करण्यात आले आहेत.
लिओन काउंटी शेरीफ वॉल्ट मॅकनील यांनी सांगितले की, इकनर (वय 20) हा विद्यापीठाचा माजी विद्यार्थी आहे. त्याच्याकडे एका शस्त्राचा परवाना होता. त्यातून त्याने अंदाधुंद गोळीबार केला. गोळी लागल्यानंतर इकनरला रुग्णालयात नेण्यात आले. घटनेच्या फूटेजमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांवर इकनर गोळीबार करत असल्याचे दिसून आले. या घटनेमुळे कॅम्पसमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
आम्हाला सुमारे आठ ते 10 गोळ्यांचे आवाज ऐकू आले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ही घटना अविश्वसनीय असल्याचे ते म्हणाले. मात्र, मृतांमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश नसून जखमी झालेले विद्यार्थी आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर सर्व वर्ग रद्द करण्यात आले असून कॅम्पस बंद करण्यात आले आहेत. अमेरिकेत गोळीबाराच्या घटना वाढत असल्याने याबाबत चिंता व्यक्त होत आहे. उच्च-क्षमतेच्या क्लिप्सच्या विक्रीवर निर्बंध घालणे आणि युद्धाच्या स्वयंचलित शस्त्रांची उपलब्धता मर्यादित करण्याची मागणी होत आहे.
ही घटना लज्जास्पद, भयानक गोष्ट आहे, असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. आपण दुरुस्तीचे समर्थक आहोत. या गोष्टी भयानक आहेत, परंतु कोणतेही शस्त्र गोळीबार करत नाही, त्याचा वापर करणाऱ्यांमुळे अशा घटना घडतात, असेही ते म्हणाले. या वर्षी आतापर्यंत अमेरिकेत किमान 81 सामूहिक गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत.