महारेराकडे गृहनिर्माण प्रकल्पाच्या नोंदणीच्या वेळी प्रकल्प पूर्ततेची दिलेली तारीख उलटली तरी कुठलीही माहिती अद्ययावत न करणाऱया 10,773 प्रकल्पांना महारेराने कारणे दाखवा नोटीस बजावल्या होत्या. या प्रकल्पांना अपेक्षित माहिती अद्ययावत करण्यासाठी महिनाभराचा कालावधी दिला होता. त्यापैकी कोणतीही माहिती अद्ययावत न करणाऱया 1950 प्रकल्पांना महारेराने स्थगिती दिली असून त्यांचे बँक खाते गोठवले आहे. तसेच त्यांच्यावर प्रकल्पाशी संबंधित व्यवहारांवरही निर्बंध लादले आहेत. यात म्हाडाच्या विक्रोळी टागोरनगर आणि कोपरी पवई अशा दोन प्रकल्पांचादेखील समावेश आहे.
महारेरा नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करताना प्रत्येक विकासकाला प्रकल्प कधी पूर्ण होणार याची तारीख आपल्या प्रस्तावात नोंदवावी लागते. या घोषित प्रकल्प पूर्ततेच्या तारखेनंतर प्रकल्प पूर्ण झालेला असेल तर भोगवटा प्रमाणपत्रासह, प्रपत्र-4 सादर करावे लागते. प्रकल्प अपूर्ण असेल तर मुदतवाढीसाठीची प्रक्रिया सुरू करणे अपेक्षित आहे किंवा प्रकल्प सुरू करण्यातच काही अडचणी आलेल्या असल्यास प्रकल्प रद्द करण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. प्रत्येक विकासकाला तिमाही, वार्षिक असे कालबद्धरीतीने विहित विवरण प्रपत्रे संकेतस्थळावर अद्ययावत करणे बंधनकारक आहे.
आणखी 3499 प्रकल्पांवरील कारवाईची प्रक्रिया सुरू
माहिती अद्ययावत न करणाऱया 10 हजार 773 प्रकल्पांना महारेराने कारणे दाखवा नोटीस बजावल्या. या नोटिसींना 5324 प्रकल्पांनी प्रतिसाद दिला असून यापैकी 3517 प्रकल्पांनी भोगवटा प्रमाणपत्र सादर केले आहे. 524 प्रकल्पांनी प्रकल्पांच्या मुदतवाढीसाठी अर्ज केले आहेत. 1283 प्रकल्पांच्या प्रतिसादांची छाननी सुरू आहे. 1950 प्रकल्पांवर प्रकल्प स्थगितीची कारवाई केली आहे. याशिवाय काहीही प्रतिसाद न देणाऱया आणखी 3499 प्रकल्पांवरील कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.