![chembur transit camp](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/chembur-transit-camp-696x447.jpg)
म्हाडा मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे मंडळाच्या अखत्यारीतील मुंबई शहर व उपनगरांतील संक्रमण शिबिरांमध्ये बायोमेट्रिक सर्वेक्षणास आजपासून सुरुवात झाली. सहकार नगर चेंबूर येथील वसाहतीतील संक्रमण शिबिरातील सुमारे 195 भाडेकरू-रहिवासी यांचे आज बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यात आले.
म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीत मुंबई शहर व उपनगरात एकूण 34 ठिकाणी संक्रमण शिबिरे आहेत. शासन निर्णयानुसार संक्रमण शिबिरातील रहिवाशांचे अ, ब व क प्रमाणे वर्गीकरण होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने शासनाने बायोमेट्रिक सर्वेक्षण करून संक्रमण शिबिरातील रहिवाशांचे वर्गीकरण करण्यासंदर्भात कळविले होते. त्यानुसार म्हाडामार्फत हे सर्वेक्षण करण्यात येत आहे.
सहकार नगर, चेंबूर वसाहतीतील मंगळवारीसुद्धा संक्रमण शिबिरातील रहिवाशांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. 12 ते 17 फेब्रुवारी या कालावधीत गोरेगाव पूर्व येथील बिंबिसार नगरमध्ये बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. बिंबिसारनगरनंतर उर्वरित वसाहतीमधील इमारतीमध्ये राहणाऱ्या भाडेकरू-रहिवासी यांचा बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
‘अ’ प्रवर्गात मूळ रहिवासी ज्यांना संक्रमण शिबिरामध्ये स्थानांतरण करण्यात आलेले आहे. ‘ब’ प्रवर्गात असे रहिवासी ज्यांनी मुखत्यार पत्र किंवा तत्सम प्राधिकार पत्राद्वारे मूळ रहिवाशांकडून संक्रमण शिबिरातील गाळ्यांचा हक्क घेतला आहे तसेच ‘क’ म्हणजे घुसखोर रहिवासी ज्यांनी म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील गाळ्यांचा बेकायदेशीपणे ताबा घेतला आहे.