193 हिंदुस्थानी मच्छीमार पाकिस्तानच्या तुरुंगात खितपत, सुटका करण्याची सामाजिक कार्यकर्ते जतीन देसाई यांची मागणी

पाकिस्तानच्या तुरुंगात 193 हिंदुस्थानी मच्छीमार हे खितपत पडले आहेत. त्यांच्या नातेवाईकांचे अश्रू थांबत नाही. त्यांची लवकरात लवकर सुटका करावी अशी मागणी पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते जतीन देसाई यांनी सरकारकडे केली आहे.

देसाई यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या 193 भारतीय मच्छीमारांचे नातेवाईक प्रचंड तणावाखाली आहेत. त्यांच्या डोळ्यातील अश्रूचा बांध आवरता येत नाही. आपले नातेवाईक पाकिस्तानच्या तुरुंगातून कधी परत येणार याची त्यांना चिंता आहे. 193 मध्ये महाराष्ट्रातील 18 मच्छीमार, आदिवासींचा समावेश आहे.

तसेच राज्यातील 18 जणांची शिक्षा 2022-23 मध्येच पूर्ण झाली आहे. त्यांची राष्ट्रीयत्व देखील हिंदुस्थानने नक्की केली आहे. तुरुंगात असलेल्या मच्छिमारांच्या नातेवाईकांची सरकारला कळकळीची विनंती आहे की त्यांची तातडीने सुटका होईल या दृष्टीने पावलं उचलली पाहिजे. तसेच आताच्या परिस्थितीत त्यांना कराचीच्या मलिर तुरुंगात अत्याचार सहन करावा लागेल, याचीही त्यांना चिंता आहे. हिंदुस्थान सरकारने या 193 मच्छीमार मलिर तुरुंगातून लवकरात लवकर परत येतील, यासाठी विशेष प्रयत्न करावेत अशी विनंती देसाई यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना केली आहे.