
गो तस्कर असल्याच्या संशयातून एका बारावीत शिकणाऱ्या हिंदू तरुणाची तथाकथिक गो रक्षकांनी गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आर्यन मिश्रा असे त्या तरुणाचे नाव असून हरयाणातील फरिदाबाद येथे हा भयंकर प्रकार घडला आहे.
आर्यन मिश्रा हा 23 ऑगस्ट रोजी रात्री बाराच्या सुमारास काहीतरी खाण्यासाठी आपल्या दोन मित्रांसोबत डस्टर कारमधून निघाला होता. त्याच वेळी काही गो रक्षकांनी त्याच्या गाडीला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र आर्यन व त्याच्या मित्रांनी गाडी न थांबवता पुढे पळवली. आर्यनचा मित्र शैंकी याचं काही दिवसांपूर्वी एक वाद झाला होता. त्यातीलच तरुण आपल्याला अडवत असतील असे त्यांना वाटले व त्यांनी गाडी भरधाव नेले.
आर्यन गाडी थांबवत नसल्याने तसेच आर्यनने टोलप्लाझावर देखील गाडी न थांबवल्याने या गो रक्षकांनी त्याच्या गाडीवर गोळीबार केला. या गोळीबारात आर्यनला गोळी लागल्याने त्याच्या मित्रांनी त्याची गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. त्यानंतर गो रक्षकांनी समोर येऊन आर्यनच्या डोक्यात गोळी घातली. यात तो जागीच मृत्युमुखी पडला. या प्रकरणी पोलिसांनी अनिल कौशिक, वरुण कृष्ण, आदेश, सौरव यांना अटक केली आहे.