शहापुरातील 19 हजार शेतकऱ्यांचे भरपाईकडे डोळे, अस्मानी संकटात सापडलेल्या बळीराजाला सरकारने वाऱ्यावर सोडले

शेतकऱ्यांच्या संतापानंतर परतीच्या पावसाने तडाखा बसलेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश खोके सरकारने दिले. मात्र याचा अहवाल देऊन महिना व्हायला आला तरी मदतीची फुटकी कवडी मिळालेली नाही. शहापुरातील तब्बल 19 हजार शेतकरी सरकारच्या भरपाईकडे डोळे लावून बसले आहेत. परंतु सत्तेचा सारीपाट खेळण्यात मग्न असलेल्या तीन तिघाडा सरकारला शेतकऱ्यांकडे पाहायला वेळ नसून बळीराजाला वाऱ्यावरच सोडले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे सरकार अशी टीमकी मिरवणाऱ्या भाजप- मिंध्यांविरोधात संताप व्यक्त होत आहे.

शहापूर तालुक्यात यावर्षी 15 हजार हेक्टर क्षेत्रावर भातपीक घेण्यात आले होते. यंदा सुरुवातीला पाऊसही समाधानकारक पडल्याने पिके जोरदार डवरली होती. त्यामुळे शेतकरी आनंदीत होते. मात्र बेभरवसी पावसाने हातातोंडाशी आलेल्या भातपिकांची पुरती वाट लावली. धुवांधार पावसामुळे कापणीला आलेली पिके शेतातच आडवी झाल्याने त्यांचा चिखल झाला. शहापूर तालुक्यातील आठ हजार हेक्टरवरील शेतीची नासाडी होऊन 19 हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. परंतु इतके नुकसान होऊनही सरकार ढिम्म असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत ठिकठिकाणी आंदोलनाचा इशारा दिला. त्यामुळे खडबडून जाग आलेल्या सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शहापूर तालुक्यात आठ हजार हेक्टरवरील शेतीचे पंचनामे करून जवळपास 11 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद अहवालामध्ये केली. परंतु हा अहवाल पाठवून एक महिना व्हायला आला तरी मदत न मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

सरकार बसले, मंत्रीपदही मिळाले… आता तरी कामे करा !

महायुतीला बहुमत मिळूनही मुख्यमंत्रीपदाच्या साठमारीमुळे भाजपला निकालानंतर सत्ता स्थापन करायला दहा दिवस उलटले होते. त्यानंतर आज गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या तीन तिघाडा युतीतील नेत्यांना मंत्रीपदही मिळाले. त्यामुळे आता तरी विकासाचा गाडा हाका.. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्या, असा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.