स्टेट बँकेवर सिनेस्टाईल दरोडा, स्ट्रॉगरुममध्ये ठेवलेले 14 कोटींचे दागिने चोरी; 500 ग्राहकांची झोप उडाली

घरात चोरी होण्याच्या किंवा दरोडा पडण्याच्या भीतीने लोक बॅंकांच्या लॉकरमध्ये पैसा अडका, सोन्या-चांदीचे दागिने आणि मौल्यावान वस्तू ठेवणे सुरक्षित मानतात. घराच्या तुलनेत बॅंकचे लॉकर अधिक सुरक्षित मानले जातात. मात्र याला छेद देणारी घटना तेलंगणातील वारंगल जिल्ह्यामध्ये घडली आहे. येथे स्टेट बँक इंडियाच्या स्ट्रॉगरुममध्ये ठेवलेले 14 कोटी रुपयांचे दागिने चोरी झाले आहेत. यामुळे जवळपास 500 ग्राहकांची झोप उडाली आहे.

वारंगल जिल्ह्यातील रायपर्थी येथे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेवर सोमवारी मध्यरात्री दरोडा पडला. दरोडेखोरांनी कटरच्या सहाय्याने स्ट्राँगरुमला छिद्र पाडले आणि जवळपास 19 किलोंच्या दागिन्यांची चोरी केली. याची किंमत 14 कोटींच्या आसपास आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि घटनास्थळी भेट देत पाहणी केली. हे काम अट्टल व्यवसायिक गुन्हेगारांचे असावे असा प्राथमिक अंदाज असल्याचे वारंगलचे पोलीस आयुक्त किशोर झा म्हणाले. एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे.

दरोड्याची घटना समोर आल्यानंतर पोलीस इन्स्पेक्टर श्रीनिवास राव यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक चौकशी दरम्यान दरोडेखोरांनी गॅस कटरने दरवाजा आणि खिडक्या कापून बँकेत प्रवेश केला. आत प्रवेश करताच दरोडखोरांनी सीसीटीव्ही फोडले आणि स्टाँगरुममधून घुसून दागिन्यांवर डल्ला मारला. त्यानंतर जाताना सीटीव्हीचा डीव्हीआरही घेऊन गेले.

दरम्यान, या दरोडेखोरांना पकडण्यासाठी चार पथक तैनात करण्यात आले आहेत. आतापर्यंत 13.6 कोटी रुपयांचे दागिने चोरी झाल्याचे समोर आले आहे. ही घटना समोर आल्यानंतर ग्राहकांनी बँकेकडे धाव घेतली आहे. परिस्थिती नियंत्रणात असली तरी बँकेजवळ पोलीस तैनात करण्यात आले आहेत.