मुरबाड तालुक्यातील धसईत गारपीट, वीज पडून तरुणीचा मृत्यू

मुरबाड तालुक्यातील धसई परिसरात रविवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. या पावसात अंगावर वीज पडल्यामुळे रविना सांडे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. तिने नुकतीच बारावी परीक्षा दिली होती. अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यात शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली.

धसईलगतच्या अल्याणी गावातील रविना सांडे (18) ही दुचाकीवरून वडील राजाराम सांडे यांच्याबरोबर धसईकडून घराकडे जात होती. अचानक पाऊस सुरू झाल्यानंतर वडील आणि मुलगी एका घराबाहेर थांबले होते. पाऊस कमी झाल्यानंतर घरी जाऊ असे तिच्या वडिलांनी तिला सांगितले. ते दोघेही पाऊस उघडण्याची वाट पाहत असताना अचानक रविनाच्या अंगावर वीज पडली. या दुर्घटनेत रविना गंभीर जखमी झाली. तिला स्थानिक रहिवाशांनी तातडीने टोकावडे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. रविनाने नुकतीच बारावी परीक्षा दिली होती.

वीटभट्टीचालकांचे मोठे नुकसान
मुरबाड तालुक्यात रविवारी अचानक पडलेल्या अवकाळी पावसाने वीटभट्टीचालकांचे मोठे नुकसान झाले. भाजण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विटा भिजल्या. पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. गुरांसाठी साठवण्यात आलेला चाराही अनेक ठिकाणी भिजला. वादळीवाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे पडली. ज्या शेतकऱ्यांचे या पावसात नुकसान झाले आहे, त्यांच्या नुकसानीचा पंचनामा करून शासकीय मदत देण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया तहसीलदार अभिजित देशमुख यांनी व्यक्त केली आहे.