वर्सोवा ते दहिसर कोस्टल रोड फास्ट ट्रॅकवर, पालिका खर्च करणार 18 हजार कोटी

मुंबईला वेगवान बनवणाऱया मरीन ड्राइव्ह ते वरळी कोस्टल रोडचे काम अंतिम टप्प्यात आले असताना आता वर्सेवा ते दहिसर या 18.47 किमीच्या कोस्टल रोडसाठी पालिकेने कंत्राटदार निश्चित केल्यानंतर आता या प्रकल्पाला सागरी व्यवस्थापन क्षेत्राची पेंद्राची व राज्याची परवानगीही मिळाली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम वेगाने मार्गी लागणार आहे. या मार्गासाठी पालिका 18 हजार कोटींचा खर्च करणार आहे.

मुंबई शहर आणि पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी मरीन ड्राईव्ह ते कांदिवली या सुमारे 35 किमी अंतरात कोस्टल रोड तयार करण्यात येणार आहे. यातील मरीन ड्राईव्ह ते वरळी प्रकल्पाचा सुमारे 10.58 किमीचा पहिला टप्पा पूर्णत्वाच्या दिशेने असून वांद्रे ते वर्सेवा प्रकल्पाचे काम एमएसआरडीसी करत असून पालिका वर्सेवा ते दहिसर या टप्प्याचे काम करणार आहे. या प्रकल्पासाठी पालिकेने 4 कंत्राटदारांची निवड केली आहे. एकूण सहा पॅकेजमध्ये हे काम चालणार असून पुढील चार वर्षांत म्हणजे सन 2027 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. मुंबईच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असलेले वर्सेवा-दहिसर हे दुसऱया टप्प्यातील काम नवीन वर्षात सुरू होणार असून हा मार्ग गोरेगाव-मुलुंड लिंक रोडला जोडला जाणार असल्याने पूर्व-पश्चिम उपनगरे जवळ येणार आहेत.

असे होणार काम

  • पॅकेज ए – वर्सेवा ते बांगूर नगर, गोरेगाव 4.5 किमी (अॅप्को इन्फ्राटेक्ट प्रा. लि.)
  • पॅकेज बी – बांगूर नगर ते माइंडस्पेस, मालाड, 1.66 किमी (जे. कुमार आणि एनसीसी लिमिटेड (संयुक्त)
  • पॅकेज सी आणि डी – उत्तर आणि दक्षिणेकडे जाणारा सर्विस रोड, मालाड माइंडस्पेस ते चारकोप कांदिवली 3.66 किमी (मेघा इंजिनीयरिंग)
  • पॅकेज ई – चारकोप ते गोराई
    3.78 किमी (लार्सन अँड टुब्रो)
  • पॅकेज एफ – गोराई ते दहिसर 3.69 किमी (अॅप्को इन्फ्राटेक्ट प्रा. लि.)