सरकार असंवेदनशील; दिल्ली चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा लपवतेय, विरोधकांचा हल्ला, रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; मृतांची संख्या 18 वर

दिल्ली रेल्वेस्थानकात शनिवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीच्या भयंकर घटनेतील मृतांचा आकडा सरकार लपवत असून त्यातून सरकारची असंवेदनशीलताच दिसत आहे. महाकुंभासाठी जाणाऱ्या भाविकांचे नियोजन अतिशय चोख हवे होते. परंतु, रेल्वे यात पुन्हा एकदा सपशेल फेल गेली असून रेल्वेमंत्र्यांनी याची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे, अशा शब्दांत विरोधकांनी आज मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. दरम्यान, दिल्ली रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीतील मृत भाविकांचा आकडा 18 वर गेला आहे. यात 11 महिला आणि पाच मुलांचाही समावेश आहे.

मृतांना श्रद्धांजली अर्पण करतानाच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. मोदी सरकार दिल्ली रेल्वे स्थानकातील चेंगराचेंगरीतील सत्य लपवत असून ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तर महाकुंभासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळण्याची कल्पना सरकारला होती. हे लक्षात घेऊन भाविकांसाठी सरकारने चोख बंदोबस्त आणि रेल्वेगाडय़ांचे चोख नियोजन तसेच रेल्वे स्थानकावर योग्य सुव्यवस्था उपलब्ध करून द्यायला हवी होती. परंतु, ढिसाळ नियोजनामुळे चेंगराचेंगरी झाली आणि रेल्वे पुन्हा एकदा चोख नियोजनात सपशेल अपयशी ठरल्याचेच समोर आल्याचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. चुकीच्या व्यवस्थापनामुळे कुणाचाही जीव जाऊ नये याची खबरदारी सरकारने घ्यायला हवी होती. मृतांच्या नातेवाईकांसोबत माझ्या सहवेदना आहेत. जखमी झालेले लवकरात लवकर बरे होवो हीच प्रार्थना अशा भावना राहुल गांधी यांनी व्यक्त केल्या आहेत.

मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाखांची नुकसानभरपाई

रेल्वे स्थानकातील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची नुकसाभरपाई देण्यात येईल. तर गंभीर जखमींना प्रत्येकी अडीच लाख आणि जखमींना औषधोपचारासाठी प्रत्येकी 1 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात येईल अशी घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे.

उच्चस्तरीय समिती करणार चौकशी

उत्तर रेल्वेचे प्रधान मुख्य व्यावसायिक व्यवस्थापक नरसिंग देव, प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त पंकज गंगवार यांची द्वीसदस्यीय समिती नवी दिल्ली रेल्वे स्थानकातील चेंगराचेंगरीच्या घटनेची संपूर्ण चौकशी करणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. या उच्चस्तरीय समितीने रेल्वे स्थानकातील सर्व सीसीटीव्ही फुजेट आणि सर्व व्हिडीयो सुरक्षित ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

18 पैकी 5 प्रवाशांचा गुदमरून मृत्यू

18 पैकी 5 प्रवाशांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे डॉक्टर राम मनोहर लोहिया रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. गर्दीमुळे मानेवर, छातीवर आणि पोटावर प्रचंड दबाव पडला. त्यामुळे श्वास घेता न आल्याने मेंदूपर्यंत ऑक्सिजन पोहोचला नाही. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. दिल्ली सरकारच्या लोकनायक रुग्णालयाने प्रवाशांचे मृतदेह डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयाकडे शवविच्छेदनासाठी पाठवले होते.

120 जणांचा मृत्यू -संजय राऊत

 दिल्लीच्या चेंगराचेंगरीमध्ये मृतांचा आकडा काहीही सांगितला जात असला तरी हा आकडा 120 पर्यंत गेला असल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. 50 कोटी लोक कुंभमेळ्यात आले असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सांगत होते, परंतु मेले किती याचा आकडा कधी सांगणार? कुंभमेळ्यात सात हजार लोक बेपत्ता झाले आहेत. हे लोक कुठे गेले, असा सवालही संजय राऊत यांनी केला.

नैतिकताच नाही -अंबादास दानवे

सिस्टमची चूक असताना लाल बहादूर शास्त्राr, नितीश कुमार हे नैतिक जबाबदारी घेऊन रेल्वेमंत्री पदाचा राजीनामा देऊ शकतात, पण ते भाजपाचे अश्विनी वैष्णव देणार नाहीत. कारण, नैतिकताच उरलेली नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. वंदे भारतचे श्रेय घेण्यासाठी भाजपाचे नेते पुढे असतात, पण चेंगराचेंगरीची जबाबदारी घ्यायला ते मागे राहतात. असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

या तीन कारणांमुळे घडली घटना

1) प्रयागराज विशेष ट्रेन, भुवनेश्वर राजधानी आणि स्वतंत्रता सेनानी एक्सप्रेस या तिन्ही ट्रेन प्रयागराजला जाणार होत्या. भुवनेश्वर राजधानी आणि स्वतंत्रता सेनानी एक्स्प्रेस उशिराने धावत होत्या. या तिन्ही ट्रेनची गर्दी प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वर होती. परंतु, जेव्हा प्रयागराज विशेष ट्रेन प्लॅटफॉर्मवर पोहोचली तेव्हा भुवनेश्वर राजधानी प्लॅटफॉर्म क्रमांक 16 वर येत असल्याची उद्घोषणा झाली. ते ऐकताच 14 वरची गर्दी 16 च्या दिशेने धावली.

2) मोठय़ा संख्येन प्रवासी तिकीट खिडकीवर होते. यातील 90 टक्के प्रवासी प्रयागराजला जाणारे होते. अचानक ट्रेन येणार असल्याची उद्घोषणा झाली आणि प्रवाशांनी तिकीट न काढताच प्लॅटफॉर्मकडे धाव घेतली आणि चेंगराचेंगरी झाली.

3) वीकेण्डची सुट्टी असल्याने महाकुंभसाठी जाणाऱयांची गर्दी वाढली. असे असताना रेल्वे प्रशासनाने स्थानकात कुठलाही नियंत्रण कक्ष उभारला नव्हता. शनिवारी सायंकाळी 7 वाजल्यापासून गर्दी वाढू लागली होती. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले गेले.