भांडुपमधील गटारात पडून झालेल्या चिमुकल्याच्या मृत्यूला जबाबदार कोण? उपायुक्त स्तरावर होणार चौकशी

भांडुप पश्चिम गावदेवी परिसरात उघडय़ा गटारात पडून 18 महिन्यांच्या चिमुकल्याच्या मृत्यूला जबाबदार कोण याची चौकशी उपायुक्त स्तरावर केली जाणार आहे. यासाठी पालिकेने उपायुक्त संतोषकुमार धोंडे यांच्यावर चौकशीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या चौकशीत जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

भांडुप पश्चिम गावदेवी परिसरातील कृष्णा गुप्ता हा मुलगा रविवारी सायंकाळच्या सुमारास आपल्या घरासमोर खेळताना उघडय़ा गटारात पडला. कुटुंबीय आणि रहिवाशांनी त्याचा शोध सुरू केला. कुटुंबीयांनी भांडुप पोलिसांत मुलगा हरवल्याची तक्रारही दाखल केली. अखेर हा मुलगा गटारात मृतावस्थेत तरंगताना आढळला. या मुलाला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र गटारात पडल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते.

स्थानिकांमध्ये प्रचंड संताप

भांडुपच्या गावदेवी परिसरात गटारांना अनेक ठिकाणी झाकणेच नसल्याचे प्रकार समोर आले आहेत. यामुळे दुर्घटना घडण्याची भीती असल्याने स्थानिकांकडून ही गटारे बंदिस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा स्थानिकांचा दावा आहे. या ठिकाणच्या गटारांची सफाईदेखील योग्य प्रकारे केली जात नसल्याचेही स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, पालिकेने मात्र संबंधित मुलगा नाल्यात पडल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे चौकशी समितीच्या अहवालाकडे लक्ष लागले आहे.