Unnao accident – भीषण अपघातात बसचे 2 तुकडे; साखरझोपेतील 18 प्रवाशांचा मृत्यू, हादरवणारा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथे भीषण अपघात झाला आहे. आग्रा-लखनऊ महामार्गावर स्लिपर बस आणि दुधाच्या टँकरमध्ये जोरदार धडक झाली. यात बसमधील 18 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि लहान बाळाचा समावेश आहे.

या भीषण अपघातामध्ये 20 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त बस बिहारहून दिल्लीला जात होती. बुधवारी पहाटे बेहडा मुजावर स्थानकांतर्गत येणाऱ्या गढा गावाजवळ बस आणि टँकरची धडक झाली. अपघातानंतर बसचे अक्षरश: दोन तुकडे झाले. पहाटे साखरझोपेत असमाऱ्या 18 प्रवाशांवर काळाने झडप घातली. अपघातानंतर घटनास्थळी मृतदेह आणि प्रवाशांच्या सामानाचा खच पडला होता.

उन्नावचे डीएम गौरंग राठी यांनी अपघाताबाबत माहिती देताना सांगितले की, पहाटे 5 वाजून 15 मिनिटांना बिहारच्या मोतीहारी येथून मार्गस्थ झालेल्या खासगी बसची आणि दुधाच्या टँकरची धडक झाली. यात 18 जणांनी जीव गमावला, तर 19 जण जखमी झाले आहेत. अपघातावेळी बसचा वेग प्रमाणापेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

बेहटा मुजावर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर स्पिपर बस बिहारच्या मोतीहारी येथून दिल्लीला जात होती. पहाटे पाचच्या सुमारास उन्नावच्या बेहटा मुजावर स्थानकांतर्गत येणाऱ्या गढा गावाजवळ एका दुधाच्या टँकरने बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी बस आणि टँकरची धडक झाली. अपघातानंतर बस एका बाजूने कापली गेली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच एसपी आणि डीएम घटनास्थळी दाखल झाले आणि मदत व बचावकार्य सुरू केले. स्थानिकांच्या मदतीने जखमींना बसमधून बाहेर काढण्यात आले. जखमींना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर 18 जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

दिशान, बिटू (वय – 9), रजनीश, लालबाबू दास, रामप्रवेश कुमार, भरत भुषण कुमार, बाबू दास, मोहम्मद सद्दा, नगमा, शबाना, चांदणी, मोहम्मद शफीक, मुन्ना खातून, तौफीक आलम अशी मृतांची नावे असून काहींची अद्याप ओळख पटलेली नाही.