
म्हाडाच्या एकगठ्ठा घर विक्री योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून या माध्यमातून आतापर्यंत विरार बोळींजमधील सुमारे 1700 घरे विकली गेली आहेत. गेल्या आठ वर्षांपासून पडून राहिलेल्या या घरांची विक्री झाल्यामुळे म्हाडाच्या डोक्यावरील भार हलका झाला असून प्राधिकरणाचा अडकलेला निधीदेखील काही प्रमाणात मोकळा झाला आहे.
म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे विरार बोळींज येथे टॉवर उभारले आहेत. कनेक्टिव्हिटी आणि मुबलक पाणी उपलब्ध नसणे अशा विविध कारणांमुळे अनेकदा लॉटरी काढूनदेखील ही घरे विकली गेलेली नाहीत. नोव्हेंबरमध्ये या घरांसाठी म्हाडाने ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजना राबवली. त्यालाही म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. शिल्लक घराच्या विक्रीसाठी म्हाडाने त्रिसदस्यीय अभ्यास समिती गठीत केली होती. या समितीने घरांच्या विक्रीसाठी पाच पर्याय सुचवले होते. त्यात एकगठ्ठा म्हणजे शंभर किंवा त्यापेक्षा अधिक घरे खरेदी केल्यास प्रत्येक घराच्या किमतीवर 15 टक्के सवलत देण्याचा पर्याय होता. त्यासाठी म्हाडाने जाहिरात प्रसिद्ध करून इच्छुक संस्था, बँकांना आवाहन केले होते.
अलिशान सुविधा मिळणार
बोळींजमधील घरे विकली जावीत यासाठी लवकरच तिथे क्लब हाऊस, जलतरण तलाव अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यासाठी म्हाडाच्या यंदाच्या अर्थसंकल्पात सुमारे 33.85 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
‘एकगठ्ठा घरविक्री’ या योजनेच्या माध्यमातून न्यू सातारा सहकारी पतसंस्थेने आतापर्यंत सुमारे 1600 ते 1700 घरांची विक्री केली आहे. म्हाडाकडून दिल्या जाणाऱ्या 15 टक्के सवलतीपैकी 12 टक्के सवलत थेट घर खरेदीदाराला तर संबंधित पतसंस्थेला 3 टक्के प्रोसेसिंग फी म्हणून दिली जाणार आहे, अशी माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.