3.19 लाख आयएमईआय नंबर बंद; 17 लाख व्हॉट्सऍप अकाऊंट ब्लॉक

केंद्र सरकारने टेलिकॉम संबंधित फसवणुकीला आळा घालण्यासाठी 3.19 लाख आंतरराष्ट्रीय मोबाईल उपकरण ओळख क्रमांक अर्थात आयएमईआय नंबर बंद केले आहेत. याशिवाय दूरसंचार विभागाने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि बिग डेटाच्या मदतीने तब्बल 16.97 लाख व्हॉट्सअ‍ॅप खाती निष्क्रिय केली. तसेच 3.4 कोटी मोबाईल फोन डिस्कनेक्ट करण्यात आले आहेत.

दूरसंचार विभागाच्या संचारसाथी अभियानाअंतर्गत फसवणुकीचे मेसेज पाठवणाऱ्या 20,000 हून अधिक जणांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात आले, अशी माहिती राज्यमंत्री चंद्रशेखर पेम्मासानी यांनी राज्यसभेत दिली. कर्ज, नोकरी, लॉटरी अशा प्रकारची आमिषे दाखवून होणारी सायबर फसवणूक टाळण्यासाठी ‘चक्षू’ प्रणाली विकसित करण्यात आली आहे. संचारसाथी पोर्टलवर लोक चक्षू प्रणालीद्वारे फसवणुकीचे कॉल्स आणि मेसेजला रिपोर्ट करू शकतात. पेम्मासानी म्हणाले की, संशयास्पद फसवणुकीशी संबंधित तक्रारी प्राप्त झाल्यानंतर दूरसंचार विभाग त्याची चौकशी करतो. त्यानंतर तपासात चुकीचा आढळलेला नंबर ब्लॉक केला जातो. वैयक्तिकरीत्या रिपोर्ट केलेल्या तक्रारीवर कारवाई करण्याऐवजी दूरसंचार विभाग संसाधनांचा गैरवापर रोखण्यासाठी लोकांकडून मिळालेला डेटा आपल्या तपासासाठी वापरतो, जेणेकरून दूरसंचार संसाधनांचा गैरवापर रोखता येईल.

दरम्यान, दूरसंचार विभाग एआय आधारित साधनांचा आणि मोठ्या डेटा विश्लेषणाचा वापर करून बनावट कागदपत्रांवर घेतलेल्या संशयास्पद मोबाईल कनेक्शनची ओळख पटवतो. दूरसंचार सेवा प्रदात्यांकडून अशा आंतरराष्ट्रीय स्पूफ कॉल्सची ओळख पटवण्यासाठी एक प्रणाली विकसित केली आहे. जेव्हा असे कॉल येतात तेव्हा जरी तो कॉल परदेशातून येत असला तरी मोबाईलवर हिंदुस्थानी नंबर दिसून येतो, मात्र या प्रणालीद्वारे असे कॉल लगेच ओळखता येतात आणि नंबर ब्लॉक करता येऊ शकतो, असे पेम्मासानी यांनी स्पष्ट केले.

दूरसंचार सेवा पुरवठादारांनी एकूण 1,150 संस्था/व्यक्तींना काळ्या यादीत टाकले असून 18.8 लाखांहून अधिक संसाधनांना डिस्कनेक्ट करण्यात आले. यामुळे नोंदणीकृत नसलेल्या टेलिमार्केटर्सच्या तक्रारींमध्ये लक्षणीय घट झाली. ऑगस्ट 2024 मध्ये 1,89,419 तर जानेवारी 2025 मध्ये घट होऊन 1,34,821 तक्रारी नोंदवण्यात आल्या. ट्रायने 2018 मध्ये टेलिकॉम कमर्शियल कम्युनिकेशन कस्टमर प्रेफरन्स रेग्युलेशन (टीसीसीसीपीआर) नियमात सुधारणा केली. त्यामुळे ग्राहक आता स्पॅम कॉल आल्यापासून सात दिवसांच्या आत तक्रार करू शकतात. पूर्वी यासाठी केवळ 3 दिवसांची मर्यादा होती.