गेल्या अनेक दिवसांपासून मुंब्रा-कौसा परिसरात पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष आहे. मुंब्रावासीयांचे हक्काचे पाणी दुसरीकडे वळवले जात असून 17 लाख लिटर्स पाण्याची दररोज चोरी होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या चोरीमागे शहरातील पाणीमाफिया किंवा पालिकेचे व्हॉल्वमन असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाणीचोरांवर कारवाई करण्यासाठी रहिवाशांनी आज पालिका आयुक्तांच्या दालनात धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला.
ठाणे महापालिका हद्दीत दिवसेंदिवस पाण्याची समस्या गंभीर होत चालली आहे. घोडबंदर रोड, वागळे इस्टेट, कळवा, मुंब्रा तसेच दिव्यात अजूनही पाण्यासाठी नागरिकांना वणवण फिरावे लागत आहे. पाण्याचा पुरवठा सुरळीत करावा यासाठी अनेक वेळा आंदोलने करण्यात आली आहेत. मात्र पालिकेकडून केवळ आश्वासने दिली जात आहेत. पाण्याचा पुरवठा नियमित होत नसल्याने नागरिकांवर चक्क माफियांकडून पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. मुंब्रा-कौसा या दोन्ही परिसरात दररोज 65 दशलक्ष लिटर पाणी पुरवले जाते. मात्र पालिका प्रशासनाकडून मुंब्यावर अन्याय केला जात असून मुंब्रा- कौसाच्या वाट्याला येणारे दररोजचे 17 लाख लिटर्स पाणी चोरले जात आहे.
हंडे आणि कळशा अधिकाऱ्यांना देऊ
ठाणे पालिकेकडून वारंवार अशीच उत्तरे दिली जात आहेत. एकीकडे 17 लाख लिटर्स पाण्याची दररोज चोरी होत आहे. याचा शोध पालिकेने घ्यायला हवा. सामान्य नागरिकांची पाण्यासाठी वणवण होत असताना पाणीमाफिया गब्बर होत आहेत. आज हे आंदोलन आम्ही शांततेत करत आहोत. जर पाणीटंचाई संपली नाही तर रिकामे हंडे आणि कळशा अधिकाऱ्यांना भेट देऊ, असा इशारा मर्जिया पठाण यांनी दिला.