26 वर्षांचा युवक 166 कोटींच्या करचोरीचा मास्टरमाइंड, नकली कागदपत्रे देऊन काढल्या कंपन्या

राजस्थानमध्ये जीएसटी चोरीचे मोठे प्रकरण उघडकीस आलेय. नकली कागदपत्रे सादर करून तीन कंपन्या सुरू करण्यात आल्या. तीन कंपन्यांच्या माध्यमातून 54 कंपन्यांसोबत बिझनेस केल्याची नकली बिले तयार केली. अवघ्या दीड वर्षात इनपुट क्रेडिट टॅक्स (आयटीसी) आणि जीएसटी रिफंडच्या नावाखाली 166 कोटींची कर चोरी केली. या सगळ्या कारनाम्याचा मास्टरमाइंड आहे 26 वर्षांचा युवक.

वीरेंद्र ऊर्फ कल्पेश कुमार असे या मास्टरमाइंडचे नाव आहे. या प्रकरणात कृष्णकुमार आणि दिनेश कुमार हे त्याचे दोन साथीदार होते, मात्र सगळा व्यवहार वीरेंद्रच्या खात्यातून झाला. 18 टक्के जीएसटीच्या हिशेबाने सगळा महाघोटाळा एक हजार कोटी रुपयांपर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे. सध्या वीरेंद्र आणि त्याचा साथीदार दिनेश कुमार पुण्याच्या जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाच्या (डीजीजीआय) ताब्यात आहे.

वीरेंद्रच्या कुटुंबीयांना मुलाचे प्रताप ठाऊक नाहीत. वीरेंद्रच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा मुलगा जयपूरमध्ये कोचिंग क्लासला जातो. त्यासाठी ते दर महिन्याला त्याला फीची रक्कम देतात.