राज्यात ट्रम्पेट चिन्ह घेऊन 163 अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर दुसरीकडे 78 ठिकाणी ट्रम्पेट चिन्ह असलेल्या अपक्ष उमेदवारांचा सामना या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांशी आहे. इतकंच नाही तर या 78 पैकी 50 ठिकाणी अजित पवार गटाचे उमेदवारही रिंगणात आहेत.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्ह मिळाले होते. पण अनेक ठिकाणी अपक्षांना ट्रम्पेट चिन्ह दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला फटका बसला होता. लोकसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघात भासकर भांगरे या अपक्ष उमेदवाराला 1 लाखहून अधिक मतं मिळाली होती. त्यांचे निवडणूक चिन्ह ट्रम्पेट होतं आणि त्यांचं मराठी भाषांतर तेव्हा तुतारी असं होतं. त्यामुळे अनेक मतदारांचा गोंधळ झाल्याचं सांगितलं जात होतं. म्हणून यावेळी निवडणूक आयोगाने ट्रम्पेट निवडणूक चिन्हाचे मराठी भाषांतर हे ट्रम्पेटच ठेवले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा मिळाला होता.