इचलकरंजीसाठीची 160 कोटींची सुळकूड पाणी योजना अखेर गुंडाळली? अधिकृत घोषणेसाठी राजकीय नेत्यांचे एकमेकांकडे बोट

इचलकरंजी शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळावे म्हणून घोषित झालेली सुळकूड पाणी योजना तब्बल चार वर्षे चर्चेत राहिली. ही योजना आता मोडीत निघाली आहे. पण याबाबत अधिकृतपणे घोषणा करण्यास सर्वच राजकीय पक्ष थंड असून, एकमेकांकडे बोट दाखवून पळवाट शोधत आहेत. एकूण चित्र पाहाता कृष्णा पाणी योजना हीच तारणारी ठरणार असल्याचे सध्याचे चित्र आहे.

इचलकरंजी शहराची पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी समस्या संपविण्यासाठी माजी पाणीपुरवठा सभापती विठ्ठल चोपडे यांनी एक प्रस्ताव तयार केला होता. तोच सुळकूड पाणी योजना नावाने प्रसिद्ध झाला होता. प्रस्ताव व त्याची मंजुरी आदीसाठी प्रयत्न केले. यातून सुमारे 140 कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार झाला. नंतर यात वाढ झाली आणि प्रकल्पाचा खर्च 160 कोटींवर गेला.

सुळकूड हे गाव कागल तालुक्यातील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील आहे. दूधगंगा नदीतून इचलकरंजीला बंद पाईपमधून पाणी खेचण्याचा हा प्रस्ताव होता. आपल्या सासुरवाडीतून इचलकरंजीला पाणी आणण्यासाठीचा चोपडे यांचा प्रयत्न होता. मात्र, कागलमधील नेते समरजीत घाटगे आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोध केल्यामुळे तसेच शेतकऱ्यांनी याविरुद्ध आंदोलनाचा पवित्रा घेतल्यामुळे वादग्रस्त सुळकूड योजनेला शासनाकडून आरंभ होईल, अशी कोणतीही चिन्हे नाहीत. तसेच योजनेसाठी नियमानुसार स्वनिधी म्हणून आवश्यक असलेली 30 टक्के रक्कम इचलकरंजी महापालिकेकडे उपलब्ध होऊ शकत नाही, हेही वास्तव आहे.

काही लोकांनी सुळकूड योजना कृती समिती तयार केली होती. तर, कागलमध्ये विरोधी कृती समिती तयार झाली. लक्षवेधी ठरणाऱ्या या योजनेबद्दल नागरिकांची उत्सुकता निर्माण करण्यात यश मिळाले. मात्र, योजना सुरू करण्यासाठी कोणतीच पावले उचलली नाहीत. नदी किनाऱ्यावर जॅकवेलसाठी जागाही खरेदी केली नाही. आता तर ती शक्यताही मावळली आहे.

निवडणुकीत शेट्टी यांना दणका
यापूर्वी शहरासाठी वारणा पाणी योजना करण्यात आली होती. मात्र, स्थानिकांच्या विरोधाने मंजूर झालेली आणि माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ऑनलाइन उद्घाटन केलेली ही योजना प्रचंड वादग्रस्त होऊन अखेर बारगळली. यांचे सूत्रधार म्हणून माजी खासदार राजू शेट्टी यांच्याकडे बोट दाखवले गेले. 2019च्या आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीत इचलकरंजीकरांनी राजू शेट्टी यांना चांगलाच दणका दिला आहे.

प्रत्यक्षात हाती काहीच नाही
इचलकरंजीत कावीळची साथ येऊन अनेकजण मरण पावले. तर हजारो लोकांवर उपचारासाठी प्रयत्न झाले. यात अनेक कुटुंबांची आर्थिक घडीच बिघडली. यानंतर स्वच्छ व मुबलक पाण्यासाठी मागणी झाली. राज्य मंत्रिमंडळाने योजनांबाबत चर्चा केली. यानंतर वारणा आणि सुळकूड योजना यांच्या चर्चा झाल्या. पण प्रत्यक्षात हाती काहीच लागले नाही. हा नेतृत्वाचा पराभव की अतिमहत्त्वकांक्षी लोकांमुळे योजना बारगळली, याबाबत चर्चा आहे. सध्या इचलकरंजीला 18 कि.मी.वरून कृष्णा नदीतून पाणी आणले जात आहे.