छत्तीसगडमध्ये सीआरपीएफ आणि नक्षलवाद्यांमध्ये पुन्हा चकमक; 16 नक्षलवाद्यांचा खात्मा, 2 जवान जखमी

छत्तीसगमध्ये पुन्हा एकदा सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली आहे. शनिवारी सकाळी सुकुमा जिल्ह्यात झालेल्या या चकमकीमध्ये 16 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. जवानांनी या भागामध्ये शोधमोहिम तीव्र केली असून अद्यापही काही भागात गोळीबार सुरू आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केरलापान पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या जंगलामध्ये नक्षलवाद्यांच्या हालचाली टिपण्यात आल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली होती. जिल्हा राखीव दल आणि सीआरपीएफचे जवान या भागामध्ये नक्षलवाद्यांविरुद्ध शोधमोहिम राबवत होते. याचवेळी त्यांच्यावर गोळीबार झाला. सुरक्षा दलाच्या जवानांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. यावेळी मोठी धुमश्चक्री उडाली. यात 16 नक्षलवादी ठार झाले असून दोन जवान किरकोळ जखमी झाले आहेत.

छत्तीसगड नक्षलवाद मुक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शोधमोहिम राबवण्यात येत आहे. याआधी 20 मार्च रोजी बिजापूर-दंतेवाडा सीमा भागात झालेल्या चकमकीमध्ये 30 नक्षलवादी ठार झाले होते. त्याआधी छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवरील इंद्रावती नॅशनल पार्क भागात झालेल्या चकमकीत 31 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते.