
गुड फ्रायडेचा मुहूर्त काढूनही राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे दोन वर्षांच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराच्या वितरण सोहळय़ाचे दिमाखदार आणि भव्यदिव्य आयोजन करण्याचे दावे हवेतच विरले. क्रीडापटूंवर मोठय़ा संख्येने केलेली पुरस्कारांची खैरात आणि पुरस्कार वितरण करताना उडालेल्या गौरवगोंधळामुळे 159 क्रीडापटूंचा पुरस्कार वितरण सोहळा उरकाउरकीचाच ठरला.
राज्य क्रीडा पुरस्कार आणि पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर केल्यानंतर होणारा गोंधळ नित्याचाच झाला आहे. त्यामुळेच हे पुरस्कार कधीही शिवजयंतीचा मुहूर्त साधू शकलेले नाहीत. त्यामुळे यंदा राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर करताना क्रीडा खात्याने सर्वतोपरीने सावधगिरी बाळगली आणि पुरस्कार जाहीर केल्यानंतर वितरण सोहळा दिमाखदार करण्याचे नियोजन केले. पण प्रत्यक्षात आजचा सोहळाही उरकाउरकीचाच ठरला. 159 खेळाडूंना पुरस्कार देताना होणाऱ्या गोंधळाची कल्पना असूनही तो टाळता आला नाही. खेळाडूंनी केलेल्या क्रीडा कामगिरीचा हा गौरव सोहळा असतानाही त्यांना यथोचित सन्मानाचे भाग्य यंदाही लाभू शकले नाही. क्रीडा खात्याचे नियोजन इतके ढिसाळ आणि गचाळ होते की, एकाचा पुरस्कार दुसऱ्याला, दुसऱ्याचा तिसऱ्याला दिला जात होता. त्यामुळे खेळाडूंसह उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील गोंधळून गेले. पुरस्कारांची संख्या अधिक असल्याने क्रीडापटूंना पुरस्कार स्वीकारतानाचे फोटोही नीट घेता आले नाहीत. रेशनसाठी जशी रांग लागायची तशी रांग आज या गौरव नव्हे गोंधळ सोहळय़ासाठी लागली होती.
आजच्या उरकाउरकीच्या गौरवगोंधळात 159 क्रीडापटूंना ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिह्याचे पालकमंत्री अजित पवार, राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पणनमंत्री जयकुमार रावल, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर व क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणे, राज्याचे क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे उपस्थित होते.
ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू प्रदीप गंधे यांना, तर माजी राष्ट्रीय कबड्डीपटू, संघटक शकुंतला खटावकर यांना ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आले. पॅरा ऑलिम्पिक पदकविजेता सचिन खिलारी, जागतिक विजेते आर्चर आदिती स्वामी, ओजस देवतळे यांच्यासह राज्यातील 159 जणांचा ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारा’ने सन्मान करण्यात आला.
राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले, इतिहास पाहता उद्योग, शिक्षण, सामाजिक सुधारणा किंवा क्रीडा क्षेत्र असो, महाराष्ट्राने देशाचे अनेक क्षेत्रांत नेतृत्व केले आहे. राज्यातील 36 जिह्यांमध्ये आज क्रीडा संकुल उभे करण्यात राज्याच्या क्रीडा विभागाने पुढाकार घेतला आहे. शाळा-महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. खेळ ही एक करीअरची संधी आहे हे विद्यार्थ्यांमध्ये रुजविले पाहिजे.
निधी देताना शिष्टाचार पाळू नका
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात मला शिष्टाचारानुसार केवळ पाच मिनिटे बोलण्यास दिले असल्याचे सांगितले होते. हाच धागा पकडून राज्यपाल राधाकृष्णन यांनी आपल्या भाषणात अजित पवारजी, तुम्ही तुमच्या भाषणात वेळेचा शिष्टाचार पाळला. पण क्रीडा विभागाला निधी देताना कुठलाही शिष्टाचार पाळू नका. अधिकाधिक निधी या विभागाला द्या, असे सी. पी. राधाकृष्णन म्हणाले.