
मुंबईतील वाढत्या तापमानामुळे नागरिकांची लाहीलाही होत असतानाच बेस्ट उपक्रमाने मुंबईकरांचा बेस्ट प्रवास आणखी ‘कूल’ करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. बेस्टच्या ताफ्यात लवकरच 140 वातानुकूलित बसेस दाखल केल्या जाणार आहेत. सध्या त्यापैकी 24 एसी बसेस प्रवासी सेवेत उतरल्या आहेत. त्यामुळे उकाडय़ात मुंबईकरांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. बेस्ट उपक्रमाच्या बस ताफ्यात नवीन 140 वातानुकूलित बसगाडय़ांचा टप्प्याटप्प्याने समावेश करण्यात येणार आहे. या बस सध्या विक्रोळी व घाटकोपर आगारात उभ्या आहेत. आरटीओ पासिंग, नोंदणी, प्रशिक्षित चालक आणि वाहक यांची उपलब्धता झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने नवीन एसी बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल केल्या जाणार आहेत. यापैकी 24 एसी बस सोमवारी बेस्टच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आल्या. सर्वसाधारण बसमार्ग क्र. 340 आणि बसमार्ग क्र.422 वर नवीन एसी बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. संबंधित बस यापुढे ए- 340 व ए- 422 या बस क्रमांकाने प्रवासी सेवेत धावणार आहेत.