
आयपीएलच्या मेगा लिलावात राजस्थान रॉयल्सने 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीला 1.10 कोटी रुपयांच्या बोलीवर विकत घेतल्यानंतर क्रिकेट वर्तुळात त्याच्याच नावाची चर्चा सुरू झाली होती. तेरावं संपून चौदाव्या वर्षात पदार्पण केलेल्या अन् अद्यापि ओठावर मिसरूडही न फुटलेल्या वैभवने अखेर शनिवारी आयपीएलमध्ये पदार्पण केलं. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा रॉय बर्मनचा विक्रम आज मोडीत काढला.
आयपीएलच्या 18व्या हंगामातील 36व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने 14 वर्षे 23 दिवसांचा असलेल्या वैभव सूर्यवंशीला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून संघात स्थान दिलं आहे. संजू सॅमसन बाहेर गेल्यामुळे त्याला ही संधी देण्यात आली आहे. बिहारच्या वैभव सूर्यवंशीने आयपीएलमध्ये पदार्पण करून इतिहास रचला. 14 वर्षीय वैभवने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या प्रयास रे बर्मनचा विक्रम मोडला, जो केवळ 16 वर्षे आणि 157 दिवसांच्या वयात आयपीएल खेळणारा सर्वात तरुण खेळाडू बनला होता. राजस्थान रॉयल्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये वैभव सूर्यवंशीला संधी मिळाली नसली, तरी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आयपीएलमध्ये इम्पॅक्ट पाडण्याची संधी त्याला चालून आली आहे.
डावखुरा फलंदाज असलेल्या बिहारच्या वैभव सूर्यवंशीने वयाच्या 12व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. रणजी क्रिकेट खेळणारा तो सर्वात लहान क्रिकेटपटू ठरला होता. 2024मध्ये वैभवला ‘टीम इंडिया’च्या 19 वर्षांखालील संघातही स्थान मिळाले होते. त्याने या दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात केवळ 58 चेंडूंत शतक ठोकून या वयोगट स्पर्धेत वेगवान शतक ठोकणारा हिंदुस्थानी फलंदाज ठरला होता, हे विशेष.