नोएडा येथील 14 वर्षीय विद्यार्थ्याने मंगळ आणि गुरु ग्रहांच्या मध्ये लघुग्रह शोधला आहे. दक्ष मलिक असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. आता या लघुग्रहाला काय नाव द्यायचे, हेदेखील तोच ठरवणार आहे. नासाने दक्ष मलिकला नाव सुचवण्यास सांगितले आहे. या संशोधनाबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
नववीत शिकणाऱ्या दक्ष मलिकने नासाच्या इंटरनॅशनल अॅस्टेरॉईड डिस्कवरी प्रोजेक्ट अंतर्गत ही कामगिरी केली. या प्रोजेक्ट अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन ग्रहांचा शोध घेण्यास प्रोत्साहित केले जाते. या प्रोजेक्टसाठी तब्बल सहा हजार अर्ज आले होते. दक्ष मलिक गेल्या वर्षभरापासून नासाच्या अॅस्ट्रोनॉमी विशेष ऑप्लिकेशनचा वापर करून ग्रहांचा शोध घेत आहे. संशोधनातील सातत्य आणि मेहनत यांच्या बळावर त्याने मंगळ आणि गुरुच्या मध्ये लघुग्रह शोधला आणि नासाला कळवले. नासाच्या अधिकाऱ्यांनी लघुग्रहाला तात्पुरते नाव दिले आहे. लघुग्रहासाठी नाव सुचवण्यास दक्ष मलिकला सांगण्यात आलंय. त्याच नावाने हा लघुग्रह पुढे ओळखला जाईल.