
वाहनाची धडक बसून गंभीर जखमी झालेला कार्तिक जाधव (14) याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. कार्तिक हा जॉगिंग करण्यासाठी सकाळी लवकर महापे मार्गावर गेला असता त्याला अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसली होती. अपघाताची कोणतीही माहिती न देता वाहनचालक पळून गेला असल्याने तुर्भे एमआयडीसी केला आहे. पोलीस फरारी वाहनचालकाचा कसून शोध घेत आहेत.
कार्तिक जाधव हा महापे येथील हनुमाननगर येथे राहत होता. लहानपणापासूनच कार्तिकला व्यायामाची आवड होती. त्यामुळे तो दरदिवशी सकाळी जॉगिंग करण्यासाठी जात होता. बुधवारी सकाळी 6 वाजता तो जॉगिंगला गेला होता. यावेळी महापे रोडवर अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. या अपघातामुळे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कार्तिकला रुग्णालयात घेऊन जायचे सोडून वाहनचालकाने तेथून पळ काढला. सुमारे 15 मिनिटे तो तेथेच पडून होता. यावेळी अनिकेत नावाच्या तरुणाने त्याला तत्काळ रिक्षातून वाशी येथील पालिकेच्या रुग्णालयात दाखल केले.
ओळख पटवण्यासाठी व्हिडीओ व्हायरल
जखमी मुलाबाबबत कोणत्याही माहिती नसल्याने नातेवाईकांशी संपर्क साधण्याकरिता अनिकेतने एक व्हिडीओ व्हायरल केला. त्यामुळे सकाळी 10 वाजता त्याच्या नातेवाईकांशी संपर्क झाला. कार्तिक बेशुद्धावस्थेत असल्याने त्याला – व्हेंटिलेटरवर ठेवले होते. कार्तिकला न्यूरोसर्जनची आवश्यकता असल्याने फोर्टिसमध्ये हलवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु त्या ठिकाणी पीआयसीयू उपलब्ध नसल्याने त्याला सायन हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.
कागदपत्रे जमा करण्यात दिवस गेला
सायन हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि इतर गोष्टींमुळे दुपारचे 4 वाजले. त्यानंतर तुर्भे पोलिसांकडून पत्र देण्यात आल्यानंतर कार्तिकला सायन हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. सायन हॉस्पिटलमध्ये कार्तिकवर उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात जर न्यूरोसर्जन उपलब्ध असता तर कार्तिकचे प्राण वाचले असते. कार्तिकच्या या अपघाती मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
वेगाचा बळी
सुसाट स्पोर्ट्स बाईक रस्ता दुभाजकावर आदळून दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घणसोली परिसरात पामबीच मार्गावर घडली. चेंबूर येथे राहणारा प्रतीक सिंग आणि त्याचा मित्र नावेद पाशा हे बाईकवरून चालले होते. पामबीचवर वेगाचा मोह प्रतीकला आवरता आला नाही. सुसाट बाईक रस्ता दुभाजकावर आदळून नावेद जागीच ठार झाला.