एका अल्पवयीन मुलाने आजी-आजोबांवर कुऱ्हाडीने वार करत खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या भयंकर घटनेने परिसरात भीतीचे वातवरण निर्माण झाले आहे. तसेच आरोपी मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यामध्ये ही थरकाप उडवणारी घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना शनिवारी तलार पहाडी गावात घडली आहे. आरोपी 14 वर्षीय मुलाची मानसीक स्थिती बरोबर नाही. तो स्वत:वरच कुऱ्हाडीने वार करत होता. परंतु ज्या वेळी त्याची आजी हीरावती (80) आणि आजोबा पीतांबर (85) यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने रागाच्या भरात त्यांच्यावर वार केला. या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता 103 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरुवात केली आहे. तसेच आरोपी किशोरला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.