सध्या देशभरात उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. याचा फटका नागरिकांसहीत प्राण्यांना सुद्धा बसत आहे. प्रखर उष्णतेमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे. पशूपालक मिळेल त्या ठिकाणी जनावरांना चरण्यासाठी घेऊन जात आहेत. ज्वारीचे फुटवे खाल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील 14 ते 15 जनावरांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यामध्ये असणाऱ्या पवैद चोंढी अंतर्गत येणाऱ्या करळगाव गावात फुटवे खाल्याने 14 ते 15 जनावरांना विषबाधा झाली. ही बाब पशुपालक किसन गुजाडे यांनी मिळाली व त्यानंतर डॉ. दिलीप चौधरी यांना ह्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, डॉ. चौधरी यांनी वेळ न दवडता बिषबाधेबाबत तालुका पशूसंवर्धन विभागाला अवगत केले. त्यानंतर पशूसंवर्धन विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पशूविकास अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बाधीत जनावरांवर उपचार केला. तातडीने उपचार केल्यामुळे मोठी जीवितहानी टळली असून एकाही जनावराचा मृत्यू झाला नाही.
जनावरांचे प्राण वाचवण्यासाठी पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रशांत झाडे, डॉ. अशोक धुर्वे, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. दिलीप चौधरी, पशूधन पर्यवेक्षक डॉ. प्रशांत गीड, डॉ. राहुल भटकर, लसीकरण सेवादाता रुपेश आडे, अनिल कुकडे, ईश्वर राऊत, भगवान काथोटे, प्रणव महानुर यांनी प्रयत्न केले.