
बारामती तालुक्यातील माळेगाव पोलीस ठाण्यात एका महिलेने गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये या महिलेवर तिघांनी सामूहिक अत्याचार केले. त्याचे व्हिडीओ, फोटो काढत तिला ब्लॅकमेल करून तिच्याकडून सुमारे 14 लाखांची खंडणी घेतली. शिवाय तिला पुढे करत एका सामाजिक कार्यकर्त्याच्या खुनाचे प्लॅनिंग करण्यात आले. महिलेने खुनाच्या प्रकरणात सहभागाला नकार देत यासंबंधी थेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. महिलेच्या फिर्यादीवरून गणेश सर्जेराव पवार (रा. प्रगतीनगर, तांदूळवाडी रोड, बारामती), अनिल शिवाजी गुणवरे (रा. श्रीरामनगर, बारामती), वाघ, एक अनोळखी यूट्यूबर, महेंद्र उर्फ भाऊ खैरे, पिसे या सहाजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सप्टेंबर 2023 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत ही घटना घडली. या गुन्ह्यातील पीडित महिला ही मुलाच्या शिक्षणाच्या निमित्ताने माळेगावमध्ये राहते. ती माळेगावमधील एका जीममध्ये व्यायामला जात असताना तिची गणेश पवार याच्याशी ओळख झाली. ओळखीतून पुढे एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेत संपर्क झाला. गणेश पवार याने महिलेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याचे व्हिडीओ, फोटो त्याने काढले. त्याचा वापर करत तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. त्यातून त्याने महिलेकडून मित्राच्या खात्यावर वेगवेगळ्या वेळी अकरा लाख सत्तर हजार रुपये घेतले. याशिवाय या महिलेवर माळेगाव, सुयश हॉटेल भिगवण, तापोळा या व इतर ठिकाणी शारीरिक संबंध केले.
पवार, महेंद्र खैरे, पिसे यांनी तिला धाक दाखवत तिरूपतीला नेले. तेथून परतत असताना तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. तेथून परतल्यावर त्यांनी तिची भेट एका यूट्यूबरशी घालून दिली. हे पत्रकार असून, ते व्हिडीओ प्रसिद्ध करतील, अशी भीती घालत त्यालाही पैसे द्यायला लावले.
व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होऊ नयेत, या भीतीपोटी ही महिला गप्प होती. सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र टिंगरे यांच्या खुनाचा कट त्यांनी आखला होता. ‘तू टिंगरे यांना नादी लाव, त्यानंतर त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल कर’, अशी मागणी आरोपींनी केली. या महिलेने त्यास नकार दिल्यावर आरोपींनी या महिलेमार्फत मच्छिंद्र टिंगरे यास कुठल्यातरी माळरानावर बोलवून घेऊन त्यांचा खून करण्याचा कट आखला होता, अशी धक्कादायक माहिती महिलेने फिर्यादीत नमूद केली आहे.
या प्रकरणावरून टिंगरे यांनी बारामतीत पत्रकार परिषद घेत यामागच्या मास्टरमाईंडचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशी मागणी केली. यावेळी त्यांनी आरोपींनी केलेली काही प्रकरणे सांगितली. ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या ट्रक मालकांकडून हप्त्याच्या स्वरूपात महिन्याला जवळपास दीड ते दोन कोटी रुपये पवार गोळा करत आहे. त्यामुळे या प्रकरणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे त्याच्या चौकशीची मागणी करणार असल्याचे टिंगरे यांनी सांगितले.