कोलकातामध्ये अग्नितांडव; हॉटेल ऋतुराजमध्ये लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू

पश्चिम बंगालची राजधानी कोलकातातील बुर्राबाजार येथील हॉटेल ऋतुराजमध्ये मंगळवारी आग लागली. या आगीमध्ये होरपळून 13 जणांचा मृत्यू झाला असून जीव वाचवण्यासाठी छतावरून उडी घेतलेल्या कर्मचाऱ्यानेही प्राण गमावले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा 14 वर पोहोचला आहे, तर अनेक जण आगीमध्ये भाजले आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुर्राबाजार येथील मेचुआ फ्रुट मार्केट परिसरात असणाऱ्या हॉटेल ऋतुराजमध्ये मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमारास आग लागली. आग लागल्याचे कळताच जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांसह हॉटेलमधील ग्राहकांची पळापळ सुरू झाली. यादरम्यान एका कर्मचाऱ्याने छतावरून खाली उडी घेतली, यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवले. आग आटोक्यात आल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि बचाव पथकाच्या सदस्यांनी हॉटेलमधील उर्वरित नागरिकांना वाचवण्यासाठी इमारतीत दाखल झाले. यावेळी हॉटेलच्या वेगवेगळ्या खोल्यांमधून आगीत होरपळलेले 13 मृतदेह सापडले.

हॉटेलमधून 14 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अनेक जणांना वाचवण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त मनोज वर्मा यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तसेच सदर घटनेची चौकशी करण्यासाठी एक विशेष पथकही तयार करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.