उत्तराखंडमधील ऋषिकेष-बद्रिनाथ राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी भीषण अपघात झाला. सकाळी 11 च्या सुमारास पर्यटकांनी भरलेली एक मिनी बस खोल दरीत कोसळली आणि 14 जणांचा मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्गावरील रतौली गावाजवळ हा अपघात झाला. या अपघातामागील कारण आता स्पष्ट झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात 10 पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला, तर थोड्या वेळाने आणखी दोन जणांची प्राणज्योत मालवली. तर अन्य दोघांचा ऋषिकेषमधील एम्स रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा 14 वर पोहोचला. अपघातग्रस्त मिनी बसमधील पर्यटक चोपता येथे फिरायला निघाले होते. मात्र ऋषिकेष-बद्रिनाथ राष्ट्रीय महामार्गावर काळाने त्यांच्यावर घाला घातला.
दरम्यान, या घटनेला मिनी बसचा चालक जबाबदार असल्याचे वृत्त आहे. चालकाला अचानक डुलकी लागल्याने त्याचे मिनी बसवरील नियंत्र सुटले आणि बस खोल दरीत कोसळली. हा अपघात झाला तेव्हा सर्व पर्यटक झोपेत होते. जवळपास 23 पर्यटक यामधून प्रवास करत होते. चोपता-तुंगनाथ-चंद्रशिला येथे ट्रेकिंगला निघालेले असताना हा अपघात झाला.
250 फूट खोल दरीत कोसळली बस
अपघातग्रस्त मिनी बस जवळपास 250 फूट खोल दरीत कोसळली. अलकनंदा नदीच्या किनारी हा अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आणि स्थानिक प्रशासनाला सर्वोतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले.
राज्य सरकार अॅक्शन मोडवर
अपघातानंतर राज्यसरकारही अॅक्शन मोडवर आले आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धानी यांनी दु:ख व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांना सदर घटनेची चौकशी करत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.