केजरीवाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना राऊस एव्हेन्यू न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. केजरीवाल यांना सीबीआयने 26 जून रोजी तिहार जेलमधून अटक केली होती. तीन दिवसांच्या सीबीआय कोठडीनंतर आज त्यांना न्यायालयात सादर करण्यात आले.

सीबीआयने आज सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती सुनैना शर्मा यांच्या खंडपीठाकडे केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली. ही मागणी न्यायालयाने मान्य केली. केजरीवाल यांना 12 जुलै रोजी न्यायालयात सादर करण्यात येणार असल्याचे केजरीवाल यांची बाजू मांडणारे वकील ऋषिकेश कुमार यांनी सांगितले. तसेच त्यांनी न्यायालयाकडे मधुमेहावरील औषधे, टेस्टिंग कीट आणि घरचे जेवण उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. ही विनंती न्यायालयाने मान्य केल्याचेही स्पष्ट केले. दरम्यान, सोमवारी किंवा मंगळवारी जामीन याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सुनीता केजरीवाल दहा मिनिटांसाठी भेटल्या
सुनावणीनंतर न्यायालयीन कक्षातच अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल या त्यांना भेटल्या. सुनीता यांना भेटण्यासाठी केजरीवाल यांच्या वतीने न्यायालयाला विनंती करण्यात आली होती. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर निर्णय राखून ठेवला आणि केजरीवाल यांना 12 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली.