मुंबई मराठी पत्रकार संघाची द्वैवार्षिक निवडणूक मोठय़ा उत्साहात पार पडली. या निवडणुकीत ‘परिवर्तन पॅनेल’चा दणदणीत विजय झाला. ‘परिवर्तन पॅनेल’चे सर्वच्या सर्व 14 उमेदवार बहुमताने निवडून आले. अध्यक्षपदी संदीप चव्हाण, उपाध्यक्षपदी राजेंद्र हुंजे आणि स्वाती घोसाळकर विजयी झाले. दैनिक ‘सामना’चे शैलेंद्र शिर्पे कार्यवाहपदी तर देवेंद्र भोगले आणि गजानन सावंत कार्यकारिणी सदस्यपदी निवडून आले. सुकृत खांडेकर यांच्या नेतृत्वाखालील ‘समर्थ पॅनेल’चा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही.
पात्र मतदारांची संख्या 673 होती. त्यातील 487 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संदीप चव्हाण यांना 316 मते मिळाली तर प्रतिस्पर्धी सुकृत खांडेकर यांना 160 मतांवर समाधान मानावे लागले. कार्यवाह पदावर शैलेंद्र शिर्पे 307 मते घेऊन विजयी झाले. उपाध्यक्षपदासाठी चुरशीची लढत झाली. त्यात परिवर्तन पॅनेलचे राजेंद्र हुंजे आणि स्वाती घोसाळकर यांचा विजय झाला. त्यांनी समर्थ पॅनेलचे उदय तानपाठक व विष्णू सोनवणे यांचा पराभव केला. कोषाध्यक्षपदी जगदीश भोवड 334 मते घेऊन जिंकले. कार्यकारिणी सदस्यपदाच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलचे सर्व नऊ उमेदवार प्रत्येकी 200 पेक्षा जास्त मते मिळवून विजयी झाले. त्यात देवेंद्र भोगले (282), दिवाकर शेजवलकर (282), गजानन सावंत (274), आत्माराम नाटेकर (273), विनोद साळवी (272), किरीट गोरे (247), अंशुमान पोयरेकर (246), राजेश खाडे (245), राजीव कुलकर्णी (234) यांचा समावेश आहे.