
मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर बुधवारी वातानुकूलित लोकलच्या अतिरिक्त 14 फेऱ्या प्रवासी सेवेत धावू लागल्या. या लोकल सोमवार ते शनिवार धावणार आहेत. उकाडय़ामुळे हैराण झालेल्या प्रवाशांना या एसी लोकलमुळे दिलासा मिळाला आहे. तथापि, प्रवाशांचा मोठा प्रतिसाद लक्षात घेत प्रशासनाने एसी लोकलचे तिकीट दर कमी करावेत, अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे. नवीन एसी लोकलच्या फेऱ्या नियमित लोकलच्या वेळेत चालवण्यात येत आहेत. मध्य रेल्वेवर यापूर्वी एसी लोकल 66 फेऱ्या धावत होत्या. बुधवारी अतिरिक्त 14 फेऱ्यांची भर पडल्यामुळे या मार्गावर एसी लोकलच्या फेऱ्यांची संख्या 80 झाली आहे. मेन लाईनवर एसी लोकलचे तिकीट काढूनही प्रवाशांना गर्दीमुळे आरामदायी प्रवास करता येत नव्हता. याबाबत प्रवाशांनी तक्रारी केल्यानंतर एसी लोकलच्या अतिरिक्त 14 फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने सामान्य प्रवाशांचा विचार करून एसी लोकलचे तिकीट दर कमी करावेत, अशी मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी केली आहे.