चाकरमान्यांचा प्रवास आणखी गारेगार होणार, पश्चिम रेल्वेवर आजपासून 13 अतिरिक्त एसी लोकल धावणार

पश्चिम रेल्वे मार्गावर आजपासून (बुधवार) 13 नवीन एसी लोकल धावणार आहेत. यामुळे चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे. सोमवार ते शुक्रवार एसी लोकलची एकूण संख्या 96 वरून 109 करण्यात आली आहे. तर शनिवार आणि रविवारी ही संख्या 52 ते 65 पर्यंत असेल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

एसी लोकलमधील वाढती प्रवासी संख्या पाहता पश्चिम रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. यामुळे एसी लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांच्या हितासाठी पश्चिम रेल्वे अतिरिक्त एसी लोकल वाढवल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले. या आठवड्यात सर्व दिवस एसी सेवा चालतील.

आधीच धावणाऱ्या एकूण रेल्वे सेवांच्या संख्येत कोणताही बदल होणार नाही. सध्या पश्चिम मार्गावर 1,406 गाड्या धावतात, ज्यात 109 एसी सेवांचा समावेश आहे. बुधवारपासून नव्याने दाखल झालेल्या एसी लोकलपैकी पहिली लोकल चर्चगेट येथून दुपारी 12.34 वाजता धावेल. अतिरिक्त 13 सेवांपैकी सहा चर्चगेट आणि सात विरारच्या दिशेने असतील, असे अभिषेक यांनी नमूद केले.

विरार-चर्चगेट आणि भाईंदर-चर्चगेट दरम्यान प्रत्येकी दोन आणि विरार-वांद्रे आणि भाईंदर-अंधेरी दरम्यान प्रत्येकी एक लोकल धावेल. त्याचप्रमाणे चर्चगेट-विरार, चर्चगेट-भाईंदर, अंधेरी-विरार, वांद्रे-भाईंदर, महालक्ष्मी-बोरिवली आणि बोरिवली-भाईंदर दरम्यान प्रत्येकी एक लोकल धावेल.