मध्य प्रदेशातील एका विद्यार्थ्याने भल्याभल्यांना थक्क करणारा आविष्कार केला आहे. मेदांश त्रिवेदी असे मुलाचे नाव असून त्याने असा ड्रोन तयार केलाय, ज्यामध्ये एखादी व्यक्ती बसून उडू शकते. मेदांशने स्वतः ड्रोनमध्ये बसून त्याची यशस्वी चाचणी केली.
ड्रोनची पॉवर 45 अश्वशक्तीपेक्षा जास्त आहे. ते 4 किमीच्या उंचीपर्यंत पायलटच्या मदतीने सहा मिनिटे उडू शकते. त्याचा वेग ताशी 60 किमी असू शकतो. सिटिंग ड्रोनचा आकार 1.8 मीटर लांब आणि रुंदी 1.8 मीटर आहे. गरजेनुसार अनेक परिस्थितींमध्ये सिटिंग ड्रोनचा वापर होऊ शकतो. त्याची उपकरणेही स्वतंत्रपणे उघडली जाऊ शकतात. ड्रोन 80 किलो वजन उचलू शकते, असे मेदांश म्हणाला.
मेदांश त्रिवेदी हा ग्वाल्हेरच्या सिंधिया विद्यालयातील बारावीचा विद्यार्थी आहे. त्याने या ड्रोनसाङ्गी तीन महिने मेहनत केली. सुमारे साडेतीन लाख रुपये खर्चून हे ड्रोन तयार केलेय. मेदांशने सांगितले की, जेव्हा तो सातव्या वर्गात होता तेव्हा शाळेचे शिक्षक मनोज मिश्रा यांनी वर्गात हेलिकॉप्टर उडवण्याचे तंत्र शिकवले. त्यातून त्याला ड्रोन बनवण्याची प्रेरणा मिळाली. मेदांशची आई स्मिता त्रिवेदी या सिंधिया स्कूलमध्ये इंग्रजीच्या शिक्षिका आहेत.