वय वर्ष 128… परंतु, तरुणांनाही लाजवेल असा उत्साह आणि आरोग्य… योगसाधनेत निपुण… अनेक आसने ते अतिशय लिलया करून दाखवतात. स्वामी सीवानंद बाबा असे त्यांचे नाव असून गेल्या 100 वर्षांत त्यांनी एकही कुंभ मेळा चुकवलेला नाही. प्रयागराज, नाशिक, उज्जैन आणि हरिद्वार येथे आयोजित कुंभ मेळ्यात त्यांनी हजेरी लावली आहे, अशी माहिती त्यांचे शिष्य संजय सर्वराजन यांनी दिली. स्वामी सीवानंद बाबा रोज पहाटे उठून किमान तासभर योगा करतात. त्यातून ते नव्या पिढीला सुदृढ आरोग्याचा कानमंत्र देतात. 21 मार्च 2022 मध्ये राष्ट्रपती भवन येथे तत्कालीन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. महाकुंभात स्वामी सीवानंद यांची जन्मतारीख 8 ऑगस्ट 1896 अशी दाखवण्यात आली आहे.
वयाच्या चौथ्या वर्षापर्यंत दूध, फळे, पोळी पाहिली नाही
बाबांनी वयाच्या चौथ्या वर्षापर्यंत दूध, फळे आणि पोळी पाहिली नाही असा दावा त्यांचे शिष्य भट्टाचार्य यांनी केला. याचा त्यांच्या जीवनशैलीवर परिणाम झाला. ते अर्धे पोट भरेल इतकेच जेवतात. रात्री 9 वाजता झोपतात, पहाटे 3 वाजता उठतात आणि योगा तसेच ध्यानसाधना करतात. दिवसभर ते झोपत नाहीत असेही भट्टाचार्य म्हणाले. दरम्यान, बाबांचे आणखी एक दिल्लीचे शिष्य हिरामन बिस्वास यांनी बाबांच्या फिटनेसबद्दलचा किस्सा सांगितला. चंदीगढ येथे 2010 मध्ये ते पहिल्यांदा बाबांना भेटले होते. तेव्हा ते 114 वर्षांचे होते. बाबा एका इमारतीत सहाव्या मजल्यावर राहत होते. इमारतीची लिफ्ट खराब होती. परंतु, ते रोज पायऱया चढून जात आणि उतरत. त्यांचा हा फिटनेस पाहून आश्चर्य वाटल्याचे ते म्हणाले. बाबांचा जन्म भिकारी कुटुंबात झाला. ते चार वर्षांचे असताना त्यांच्या आईवडिलांनी त्यांना संत ओमकारानंद गोस्वामी यांच्याकडे सोपवले होते, असे सांगण्यात येते.