संगमनेर तालुक्यासाठी 128.98 कोटी रुपयांचा पिक विमा; 84,930 शेतकऱ्यांना फायदा होणार

संगमनेर तालुक्यातील 84 हजार 930 शेतकऱ्यांना 128 कोटी 98 लाख रुपयांचा पिक विमा मंजूर झाल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी दिली आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून आणि पाठपुराव्याने शेतकऱ्यांना पिकविमा मिळणार आहे.

आमदार बाळासाहेब थोरात हे कृषिमंत्री असताना महाराष्ट्रातून सर्वाधिक कृषी उत्पन्न झाले. याचबरोबर त्या काळात सातत्याने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या गेल्या. महसूल मंत्री आणि कृषिमंत्री म्हणून आमदार थोरात यांनी संगमनेर तालुक्यात सातत्याने विकासाची योजना राबवली. उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणारे निळवंडे धरण व कालवे पूर्ण करून दुष्काळी भागाला त्यांनी पाणी दिले आहे.

आमदार थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील 84930 शेतकऱ्यांना खरीप हंगाम पीक विम्यासाठी पाठपुरावा केला आणि यातून प्रधानमंत्री पिक विमा योजनेमधून 2023 मधून नगर जिल्ह्यातून सर्वाधिक पिक विमा हा संगमनेर तालुक्याला मंजूर झाला आहे. यामध्ये मध्यम नुकसान भरपाई ची आग्रिम रक्कम 33.86 कोटी रुपये मंजूर झाली असून स्थानिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतीसाठी 10 लाख 65 हजार रुपये आणि अंतिम पीक कापणी प्रयोगावरून आलेल्या उत्पन्नावर आधारित विमा रक्कम एकूण 95 कोटी 1 लाख रुपये असे एकूण 128 कोटी 98 लाख रुपये मंजूर झाले आहेत. शेतकऱ्यांना हा पिक विमा बँक खात्यात मिळणार आहे.