विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने ईव्हीएमच्या माध्यमातून मोठा घोटाळा केलाचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. अमरावती जिह्यातील अचलपूरचे माजी आमदार बच्चू कडू यांनी गावातील 125 लोकांनी स्टॅम्प पेपरवर मला मतदान केल्याचे लिहून दिले आहे, पण प्रत्यक्षात 60 च मते आपल्याला मिळाल्याचे सांगत ईव्हीएमवर घेण्यात येणाऱया मतदानाबाबत संशय व्यक्त केला आहे.
अचलपूर मतदारसंघातील गावात मला मतदान कमी झाल्याचे कडू यांनी म्हटले आहे. ब्राह्मणवाडा थडी येथील मतदान केंद्रावर मागच्या निवडणुकीत 148 मते मिळाली होती, मात्र यंदाच्या निवडणुकीत केवळ 60 मते मिळाली आहेत. विशेष म्हणजे त्या गावातील 125 लोकांनी मला स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्रावर लिहून दिले आहे, ज्यामध्ये आम्ही तुम्हालाच मतदान केल्याचे ते सांगत असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. तसेच या प्रकरणात कोर्टात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
कोर्टही बदमाश…
माझं मतं कुणाला गेलं हे माहिती असणं सामान्य मतदाराचा अधिकार आहे, मात्र आता व्हीव्हीपॅट म्हणजे वरलीचा खेळ झाला आहे. त्यासाठी आम्ही आता कोर्टात जाऊ, कोर्टही बदमाश आहे. कोर्ट आम्हाला न्याय देईल असं वाटत नाही. पण आम्ही कोर्टात जाऊ असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे.