यवतमाळमध्ये पाण्याकरिता वणवण करणाऱ्या 12 वर्षांच्या मुलीचा करुण अंत, मोदी सरकारच्या ‘हर घर जल’ योजनेचे पितळ उघड

‘हर घर जल’ योजनेतून शहरांबरोबरच गावातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पोहोचविण्याच्या मोदी सरकारच्या योजनेचे पितळ उघडे पाडणारी हृदयद्रावक घटना यवतमाळमध्ये समोर आली आहे. आर्णी तालुक्यात घरात नळ येऊनही पाणीपुरवठा सुरू न झाल्याने पाण्याकरिता वणवण करणाऱ्या वेदिका चव्हाण या 12 वर्षांच्या मुलीचा करुण अंत ओढवला. वस्तीपासून दीड किलोमीटर अंतरावरील अरुणावती नदीत पाणी आणण्याकरिता गेलेल्या वेदिकाचा पाय घसरून नदीत पडून तिचा बुडून मृत्यू झाला.

वेदिका राहत असलेल्या आर्णी तालुक्यातील काठोडा पारधी वस्तीतील प्रत्येक घराबाहेर एक वर्षापासून सरकारची पाण्याची पाइपलाइन आली आहे. मात्र या ठिकाणी केवळ नळ लागले आहेत. पाणीपुरवठा सुरू न झाल्याने लोकांची पाण्यासाठीची वणवण सुटलेली नाही. त्यात वस्तीतला पाण्याचा एकमेव हँडकंपही चार महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे लोकांना जीव धोक्यात घालून दीड किलोमीटरची पायपीट करत अरुणावती नदीतून पाणी आणावे लागते. त्यातच पाणी आणण्याकरिता गेलेल्या वेदिकाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याने सरकारच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त होत आहे.

आधीही अनेकांचा जीव गेला

वेदिकाप्रमाणे या परिसरात पाण्याकरिता वणवण करताना अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अशा घटना घडल्या की एक-दोन टँकर पाठवून लोकांना शांत केले जाते. मात्र लोकांच्या दाराबाहेर आलेल्या नळांना पाणीपुरवठा करण्याकरिता सरकारला मुहूर्त सापडलेला नाही. सरकारच्या या ढिसाळ कारभाराविरोधात प्रचंड संताप व्यक्त होत आहे.